Tuesday , March 21 2023
Breaking News

नकुशी होतेय हवीशी मुलींना दत्तक घेण्यास अधिक पसंती

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

देशात लिंग गुणोत्तराचे प्रमाण फारसे चांगले नसताना तसेच स्त्रीभ्रूणहत्येची समस्या कायम असताना मुलींबद्दल समाजाचा दृष्टिकोन बदलत असल्याचा एक आशेचा किरण दिसून आला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण जास्त असल्याची आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. त्यामुळे मुलींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत असल्याचे अधोरेखित झाले आहे. विशेष म्हणजे देशात आणि देशाच्या बाहेरून अशा दोन्ही प्रकारांचा विचार केल्यास मुलींना दत्तक घेण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांतील देशातील दत्तक

मुलांची आकडेवारी पाहिल्यास नकुशी हवीहवीशी झाल्याचे दिसून येते. गेल्या तीन वर्षांत देशात 11,649 मुले दत्तक घेण्यात आली. यातील मुलींची संख्या 6,962 होती, तर मुलांचे प्रमाण 4,687 इतके होते. 2015-16मध्ये देशात एकूण 3,011 मुले दत्तक घेतली गेली. यात मुलींची संख्या 1,855 होती. 2016-17मध्ये 3,210 मुले दत्तक घेतली गेली. त्यात मुलींचे प्रमाण 1,915 इतके होते. 2017-18मध्ये 3,276 मुले दत्तक घेण्यात आली. त्यात मुलींची संख्या 1943 होती, तर 2018-19 (डिसेंबर 2018 पर्यंत) देशात 2,152 मुले दत्तक घेण्यात आली. यापैकी 1249 मुली होत्या. गेल्या तीन वर्षांचा विचार करता दत्तक घेण्यात आलेल्या एकूण

बालकांमध्ये मुलींचे प्रमाण जवळपास 60 टक्के आहे. याशिवाय देशाच्या बाहेरूनही मुली दत्तक घेण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांत 2,310 मुले दत्तक घेण्यात आली. यातील 1,549 मुली होत्या. म्हणजेच देशाच्या बाहेरून मुली दत्तक घेण्याचे प्रमाण 69 टक्के इतके आहे. महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने लोकसभेत ही आकडेवारी मांडली. लोकसभा सदस्य तेजप्रताप यादव, एल. आर. शिवरामे गौडा आणि अंजू बाला यांनी विचारलेल्या प्रश्नांनंतर ही आकडेवारी मंत्रालयाकडून सादर करण्यात आली.

Check Also

शासकीय कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे!

सरकासोबत चर्चा यशस्वी मुंबई : प्रतिनिधी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांचा संप …

Leave a Reply