पनवेल : रामप्रहर वृत्त
खासगी उद्योगांमध्ये महिलांसहित सर्व प्रवर्गांना त्यांच्या लोकसंख्येच्या 50 टक्के आरक्षण आर्थिक निकषांवर लागू करण्यात यावे, अशी मागणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सोमवारी (दि. 3) साजर्या झालेल्या जयंतीनिमित्त ङ्गआंबेडकरी संग्राममने पुढे आणली आहे. संघटनेचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी सत्याग्रह कॉलेजमधील जयंती समारंभात बोलताना ही मागणी केली.
पुरुषांच्या बरोबरीची लोकसंख्या असलेल्या महिलांसाठी आरक्षण देण्याची सक्ती नसेल तर संसदीय राजकारणात शिरकावासाठी त्यांना स्वेच्छेने उमेदवारी कितपत मिळू शकते, असा सवालही त्यांनी या वेळी केला. खाजगी विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये महागडे शुल्क भरणार्या मुलांच्या पालकांना आयकरात देण्यात येणारी शुल्काइतकी सूट बंद करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या आयकरातील सुटीमुळे धनवंतांच्या मुलांना महागडे दर्जेदार शिक्षण मोफतच मिळत आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले. या समारंभाला वनिता सूर्यवंशी, डॉ. निधी अग्रवाल, एम. एल. सूर्यवंशी, सुजाता भोसले, नेहा राणे आदी मान्यवर उपस्थित होते.