Breaking News

कबड्डी संघांची भाईगिरी ठेचा!

रायगड जिल्हा म्हणजे कबड्डीचे माहेरघर समजले जाते. येथे कबड्डीच्या जेवढ्या स्पर्धा होतात तेवढ्या स्पर्धा अन्य जिल्ह्यात होत नाहीत, परंतु याच जिल्ह्यात कबड्डी स्पर्धेत जेवढ्या भानगडी होतात तेवढ्या भानगडी इतर कोणत्याही जिल्ह्यात होत नाहीत. रायगड जिल्ह्यातील कबड्डीला भानगडींचा शाप आहे. याला जबाबदार जेवढे खेळाडू आहेत तेव्हढीच रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनदेखील याला जबाबदार आहे. आपण काही केले तरी आपले कुणी काहीच करू शकत नाही असे या खेळाडूंना व संघांना  वाटते. याचे कारण असोसिएशन बोटचेपे धोरण घेते. त्यामुळेच हे संघ भाईगिरी करतात. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनने बेशिस्त खेळाडू व  संघांची भाईगिरी वेळीच ठेचली पाहिजे. या भाईगिरीमुळे रायगडची बदनामी होत आहे.

नुकतीच उरण तालुक्यातील बोकडवीरा येथे जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा झाली. यात प्रत्येक दिवशी भानगडी झाल्या. अगदी मारामारीपर्यंत प्रकरणे गेली. ही स्पर्धा स्थानिक संघाने आयोजि केलेली नव्हती. जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा ही रायगड जिल्हा असोसिएशनची असते. त्यामुळे या स्पर्धेची सर्वस्वी जबाबदारी ही असोसिएशनची असते. स्पर्धेच्या वेळी असोसिएशचे सर्व पदाधिकरी उपस्थित असतात तरीदेखील मारामार्‍या होतात. एवढे धाडस खेळाडूंमध्ये येते कुठून आणि असोसिएशन हा बेशिस्तपणा खपवून तरी का घेते. याचे कारण आहे काही भागातील खेळाडूंना व संघांना असे वाटते की असोसिएशन आपलीच आहे. कोण आपल्यावर कारवाई करणार. विशेषतः पेझारी परिसरातील संघ जरा जास्तच भाईगिरी करतात. या संघांना असोसिएशनने अवारलेच पाहिजे. बेशिस्त संघ मग तो कुठलाही असो त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. हे धाडस जोपर्यंत कबड्डी असोसिएशन करणार नाही तोपर्यंत असेच चालू राहणार.

एकाच दिवशी स्पर्धा खेळल्यामुळे खेळाडू व पंच दमतात. त्यामुळे यंदा स्पर्धा चार दिवस खेळवण्यात आली. अलिबाग व पेण तालुक्याच्या बाहेर स्पर्धा खेळवल्यामुळे भानगडी होणार नाही म्हणून स्पर्धा उरण तालुक्यात घेतली, पण व्हायचे ते झालेच. भानगडी झाल्याच. बहुतेक वेळा पंचांचे निर्णयाचे कारण देऊन मैदानावर  वाद घातले गेले.  पंचांवर हात उचलला गेला. पंच हा माणूस आहे. त्याच्याकडूनदेखील चुका होऊ शकतात, परंतु आम्हाला वादच करायचा असतो. भानगडी करायच्या असतात. त्यामुळे पंचांचा निर्णय हे एक निमित्त सापडते. वशिलेबाजी हेदेखील या बेशिस्तीचे  महत्त्वाचे कारण आहे. आपला माणूस असोसिएशनमध्ये आहे. तो घेईल सांभाळून असे संघांना वाटते. आपण कसेही वागलो तरी काही होणार नाही. आपल्या संघातील खेळाडूंची जिल्ह्याच्या संघात  निवड होईल हे खेळाडूंना पक्के माहीत असते. त्यामुळे खेळाडूंमध्ये भीतीच राहत नाही. ते कुणाला घाबरत नाहीत. जर असोसिएशन कारवाई करते असे वाटले की गावकी मोर्चा काढणार. या दबावाखाली पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या खेळाडूची निवड होते. किती दिवस हे चालणार. पंचांवर हात उचलला जातो तरी असोसिएशन काहीच करत नाही, तर पंचांनी दाद मागायची तरी कुठे. काही खेळाडू व संघांमुळे रायगडच्या कबड्डीची बदनामी होतेय. चार वर्षांपूर्वी बांधण येथे जिल्हा निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत वाद  झाले. असोसिएशनला हे वाद मिटवता आले नाहीत. स्पर्धाच रद्द करण्याची नामुष्की असोसिएशनवर आली. जर तेव्हाच कबड्डी असोसिएशनने बेशिस्त खेळाडू व त्यांच्या संघांवर कठोर कारवाई केली असती, तर खेळाडूंना एक संदेश गेला असता. असोसिएशनने बोटचेपे धोरण घेतल्यामुळे खेळाडूंना धाकच राहिला नाही.  

खरंच रागडच्या कबड्डीचे  आणि कबड्डीपटूंचे भले व्हावे असे वाटत असेल तर असोसिएशनने थोडे कठोर व्हायलाच हवे आणि वाशिलेबाजी थांबवली पाहिजे. जिल्ह्याचा संघ निवडताना  खेळाडूचा केवळ चाचणी स्पर्धेतील कामगिरीचा विचार न करता खेळाडूच्या वर्षभरातील कामगिरीचादेखील विचार केला पाहिजे. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनने वशिलेबाजीची कीड नष्ट करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. निवड समितीला पूर्ण अधिकार दिले पाहिजेत. तरच चांगला संघ निवडला जाईल व मारामार्‍या कमी होऊ शकतात.

एकेकाळी केवळ आठच महिलांचे संघ चाचणी सपर्धेत खेळायचे. चाचणी झाली की महिलांच्या स्पर्धा होत नसत. काही वर्षांपासून महिलांचे संघ वाढले. रायगडने काही राष्ट्रीय खेळाडू दिल्या, परंतु  पुन्हा रायगड जिल्ह्यात महिलांच्या कबड्डी स्पर्धांचे प्रमाण कमी झाले. पूर्वी पेण व अलिबाग तालुक्यातील महिला संघांचाच दबदबा असायचा. यंदा पनवेल तालुक्यातील दोन संघ अंतिम फेरीत पोहचले होते. ही चांगली बाब आहे. केवळ पनवेल तालुकाच नाही, तर इतर तालुक्यांतदेखील महिलांचे कबड्डी संघ वाढले पाहिजेत. त्यासाठी  महिलांच्या कबड्डी स्पर्धा व्हायला हव्यात. तरच रायगडात चांगल्या महिला खेळाडू तयार होऊ शकतात. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनने यासाठी प्रयत्न करायला हवेत. प्रत्येक कार्यकारिणी सदस्याने आपल्या गावात एक महिला कबड्डी स्पर्धा आयोजित केली तरी भरपूर स्पर्धा होतील.

-प्रकाश सोनवडेकर, खबरबात

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply