Breaking News

उरणमध्ये कांदळवनांची खुलेआम कत्तल ; भूमाफियांच्या कृत्यानंतरही शासकीय अधिकारी निष्क्रिय

उरण : बातमीदार

तालुक्यात औद्योगिकीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात कांदळवनांची कत्तल खुलेआम सुरू आहे, मात्र स्थानिक प्रशासन याबाबत अनभिज्ञ आहेत. भूखंड हडप करण्यासाठी ही कांदळवनाची कत्तल केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कांदळवनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. खारफुटी जमिनीची धूप रोखतात. सागरी जीवांचे रक्षण करणारे, तसेच त्सुनामीसारखी नैसर्गिक आपत्ती रोखणारी, औषधी असलेली, तसेच सेंद्रिय गोष्टींचा साठा करणारी अशी बहुउपयोगी असलेल्या कांदळवनाचे जतन होणे आवश्यक आहे, पण उरणमध्ये भूमाफियांकडून कांदळवनांची कत्तल सुरू आहे. याबाबत संबंधित ग्रामपंचायत, तहसील, वनविभाग अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उरण परिसरात अनेक ठिकाणी कांदळवनाची कत्तल मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामध्ये बिल्डर लॉबीही सहभागी आहे. खारफुटीचे वृक्ष तोडून भरावाचे काम सुरू आहे. इतकेच नाही तर कापलेल्या झाडांचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांना आगी लावून पुरावा नष्ट केला जात आहे. हा सारा प्रकार सुरू असतानाही याबाबत स्थानिक प्रशासनाला कोणतीही माहिती नाही. ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत ही कांदळवनाची झाडे येतात त्या ग्रामपंचायतीला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले जाते, तर तहसील व वनविभाग एकमेकांकडे बोट दाखवितात. उरण परिसरात असलेले कांदळवन नष्ट करायचे आणि भराव करून विकसकांच्या घशात भूखंड घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply