Breaking News

उचलली जीभ…!

नुकत्याच घडलेल्या हैदराबाद येथील एका डॉक्टर युवतीच्या बलात्कार आणि हत्येच्या पार्श्वभूमीवर हे विधान त्यांनी करायला नको होते. बलात्काराच्या घटनांमुळे देशातील जनता आधीच हळवी झाली आहे. सोशल मीडियापासून अन्य अनेक माध्यमांपर्यंत सर्वच स्तरांवर बलात्काराच्या घटनांबद्दल असंतोष व्यक्त होत असताना सुज्ञ पुढार्‍यांनी सांत्वनाचा सूर लावणे अपेक्षित असते, परंतु या सुज्ञपणाची अपेक्षा कुठल्याही बेजबाबदार नेतृत्वाकडून कशी बरे करता येईल?

सार्वजनिक जीवनात वावरताना आपण काय आणि कसे बोलतो, कसे वागतो याचे भान ठेवण्याची नितांत आवश्यकता असते. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील अनेक दिग्गज नेत्यांनी वेळोवेळी आपल्या उच्च मूल्यांसह देशाचे नेतृत्व केले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे तर पहिल्या फळीतील नेत्यांचे जीवनसूत्र होते. उत्तम वक्तृत्वाद्वारे आपला मुद्दा अचूक पटवून देणे हे एक कसब असते. अर्थात उत्तम वक्तृत्व याचा अर्थ पल्लेदार वाक्ये आणि नाटकीय हातवारे असा कोणीही घेऊ नये. पूज्य साने गुरुजींचेच उदाहरण येथे पुरेसे ठरावे. सौम्य शब्दांमध्ये प्रसंगी कोणाचे कानदेखील पिळता येऊ शकतात याचे प्रत्यंतर साने गुरुजी, गांधीजी, लालबहादूर शास्त्री अशा अनेक दिग्गज पुढार्‍यांनी दिले. भारतात लोकशाही दृढमूल करण्यामध्ये अशा नेत्यांचा सिंहाचा वाटा होता, परंतु काळाच्या ओघात लोकशाहीचे हे स्वरूप बदलू लागले आहे आणि हा बदल सकारात्मक आहे, असे म्हणायला जीभ वळत नाही हे आपले दुर्दैव म्हणावे लागेल. गुरुवारी झारखंडमधील गोड्डा येथे निवडणूक प्रचारसभा घेताना काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी ‘मेक इन इंडिया’ करता करता भारतात ‘रेप इन इंडिया’ चालू आहे, अशा आशयाचे निंदनीय विधान केले. साहजिकच देशभर त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. राफेल विमानखरेदी व्यवहाराबाबत राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयात सपशेल माफी मागावी लागली होती. अत्यंत बेजबाबदार वक्तव्ये करून आपल्याच पक्षाला वारंवार अडचणीत आणणार्‍या या माजी काँग्रेस अध्यक्षाला त्याची किंमतदेखील मोजावी लागली आहे, परंतु एका परिवाराच्या भजनानंदी रममाण असलेल्या काँग्रेस पक्षाला अजूनही शहाणपण आले आहे असे वाटत नाही. सर्वोच्च नेता जेव्हा वारंवार अशी बेजबाबदार वक्तव्ये करतो, तेव्हा तळागाळातील कार्यकर्ते त्याचेच अनुकरण नकळत करू लागतात. स्वाभाविकच समाजात तेढ वाढीस लागते. आपल्या वक्तव्यांमुळे पक्षाचे तसेच देशाच्या प्रतिमेचेही विद्रुपीकरण होते याचे भान प्रत्येक पक्षाच्या मोठमोठ्या नेत्यांनी ठेवणे गरजेचे आहे. राहुल गांधी यांच्या ताज्या वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. त्यावर यथावकाश आयोग आपला निकाल देईल, परंतु त्यातून राहुल गांधी किंवा त्यांचा पक्ष काही धडा घेईल याची शक्यता कमीच. दगड मारून पळ काढण्याच्या या वृत्तीला मतदार योग्य ते उत्तर चोखपणे देतात हादेखील इतिहास ताजाच आहे. अशाच वृत्तीमुळे राफेलप्रकरणी तोंडघशी पडलेल्या राहुल गांधी यांना त्यांच्या पारंपरिक मतदारसंघात म्हणजेच अमेठीमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. नेत्याने आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवले तर लोकशाहीची बूज राखली जाते आणि निवडणुकीचा स्तर खालावत नाही. नेता कसा नसावा हेच राहुल गांधी वारंवार दाखवून देत आहेत.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply