Breaking News

कांदाचोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या डोळ्यांत पाणी

पनवेल ः प्रतिनिधी

कांद्याला सोन्याचा भाव आल्याने सामान्यांच्या डोळ्यांत पाणी आले असताना पोलिसांनाही कांदाचोरांना शोधण्याचे काम करावे लागत आहे. अनेक पोलीस ठाण्यांत कांदाचोरीच्या तक्रारी दाखल होऊ लागल्याने पोलिसांच्या डोळ्यांत पाणी येऊ लागले आहे.

मराठी लोकगीतातील कांदा न भाकर घेऊ द्या की रे, मला बी जत्रेला येऊ द्या की रे, असे म्हणत जत्रेला जाणारा गरीब माणूस आज कांद्याला सोन्याचा भाव आल्याने सापडणे अवघड झाले आहे. हॉटेलमध्ये कांदा भजी खाणे ही आज चैन झाली आहे. कांदा हा गरिबांच्या रोजच्या जेवणातील पदार्थ. भाकरीबरोबर कांदा असला की त्याचे जेवण व्हायचे, पण आज तो श्रीमंतांच्या घरातील खास पार्टीतील पदार्थ बनला आहे. कांद्याचे रोज वाढणारे भाव पाहून चोरांनीही कांद्याची चोरी करणे पसंत केल्याने पोलिसांनाही कांद्याची चोरी शोधण्याचे काम वाढले आहे. 

एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याची पोती चोरीला गेल्याने कांदा व्यापार्‍यांनी अखेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याची माहिती मिळाली आहे. या कांद्याने पनवेलमधील मंडईतही अनेक विक्रेत्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. पनवेल मंडईतील छोटे दुकानदार रोज सरासरी 50 ते 80 किलो कांदा विकायचे. आज दिवसभरात 20-25 किलो कांदा विकला जात असल्याची माहिती येथील व्यापार्‍यांनी दिली.

पूर्वी तीन ते पाच किलो कांदा  घेऊन जाणारे आज कांद्याचा भाव विचारतात आणि एक किलो कांदा घेऊन जातात. त्यामुळे रोज 20 किलोही कांदा विकला जाणे अवघड  झाले आहे. याचा परिणाम भाजी विक्रेते आणि मोड आलेली कडधान्य विकणार्‍यांवरही झाला आहे. ज्या भाजीला कांदा लागतो त्या भाजीची विक्री कमी झाली असून कांदा न टाकता किंवा कांदा कमी लागणार्‍या भाजीला मागणी असल्याची माहिती येथील भाजी विक्रेत्यांनी दिली. मोड आलेले 10 ते 12 किलो कडधान्य रोज विकणार्‍या रंजना गीते म्हणतात की, कडधान्याची उसळ करण्यासाठी कांदा लागतो. त्याचे भाव वाढल्यापासून आमच्या दुकानात दिवसभरात पाच ते सहा किलो भिजवलेले कडधान्य विकले जात आहे. आमच्या कुटुंबाची उपजीविका यावरच अवलंबून असल्याने आम्हाला खरोखरंच कांद्याने रडवले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply