Breaking News

पारा घसरला

ऋतुचक्र बदलत असते, परंतु निसर्गाची परिक्रमा ही ठरलेलीच असते. अलीकडच्या काळात मात्र त्यात प्रचंड बदल झालेला आहे. हल्ली कधीही पाऊस पडतो. यंदा तर वरुणराजाने धो धो बरसून सर्वांना अक्षरश: झोडपले. तरीही अधेमधे ढगाळ वातावरण निर्माण होऊन उकाडा जाणवत होता. अखेर थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. तीदेखील हुडहुडी भरविणारी.

तशी थंडीची चाहूल गेल्या काही दिवसांपासून लागली होती. वातावरण कूस बदलत होते, पण म्हणावा तसा गारवा आला नव्हता. सर्वांना प्रतीक्षा असलेली थंडी दोन महिने उशिराने आली. सरत्या वर्षाला निरोप देताना गुलाबी थंडीचे आगमन झाले आहे. ही थंडी उशिरा आली खरी, पण तिने दोनच दिवसांत कहर केला. उत्तर भारत थंडीच्या कडाक्याने गारठला असून, राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे, तसेच मध्य प्रदेशमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीतील थंडीने मागील जवळपास 120 वर्षांपासूनचा विक्रम मोडीत काढला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार दिल्लीतील अनेक भागांत तापमानाचा पारा दोन अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेला आहे. जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशासह उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, उत्तराखंड, लडाख, हिमाचल प्रदेश, झारखंड या राज्यांमध्ये तर थंडीची लाट आली आहे. एवढेच नव्हे तर राजस्थानच्या पाच शहरांमध्ये पारा पाच अंश सेल्सिअसच्या खाली घसरलाय. यंदा पाऊसही विक्रमी पडला, तशीच थंडीही हुडहुडी भरविणारी आहे. हा गारवाही आधीचे रेकॉर्ड मोडेल अशी चिन्हे दिसत आहेत. दिल्लीतील यंदाचा हिवाळा हा सन 1901नंतरचा दुसर्‍या क्रमांकाचा गारठवणारा हिवाळा ठरला आहे. राजधानीतील या थंडीचा विमान आणि रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झालाय. दुसरीकडे स्कायमेट या वृत्तसंस्थेच्या अनुमानानुसार 31 डिसेंबर, 1 आणि 2 जानेवारी रोजी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर उत्तर भारतातील डोंगराळ भागांमध्ये 3 जानेवारीला बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नंतर पुन्हा थंडीचा कडाका वाढू शकतो. थंडीने महाराष्ट्रातही जोरदार आगमन केले असून, नागपूरमधील ब्रह्मपुरी हे राज्यातील सगळ्यात थंड ठिकाण ठरले. तेथे 8.7 अंश तापमानाची नोंद करण्यात आली, तर भंडारा जिल्ह्यात धानाच्या काडीवर दवबिंदू गोठल्याचे दिसून आले. भंडारा शहराजवळील पांढराबोडी येथील शेतात हा प्रकार पाहावयास मिळाला. साहजिकच थंडी पडू लागल्याने कपाटात ठेवलेले स्वेटर्स, मफलर बाहेर आले आहेत. यंदा थंडी उशिराने सुरू झाली असली तरी आता थंडी जोर पकडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत तापमान 10 अंशांच्या खाली उतरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी पावसाचाही अंदाज आहे. ऐन थंडीच्या दिवसांत वातावरणाने कूस बदलली असून, कधी पाऊस, कधी थंडी यामुळे आजारांचा धोका वाढला आहे. हे वातावरण वर्षाच्या अखेरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतावरही आजारांचे विरजण पडण्याची भीती आहे. तेव्हा हाडे गोठवणार्‍या थंडीत प्रत्येकाने स्वत:सह कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply