Monday , February 6 2023

उल्हास नदी संवर्धनाचा प्रयत्न

बारमाही वाहणारी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली की त्यावर अवलंबून असलेल्या सर्वांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यात केवळ पिण्याचे पाणी प्रदूषित होत नाही, तर नद्यांमधील जीवांचे आयुष्यदेखील प्रदूषित पाण्यात असल्याने कमी होत जाते, मात्र कर्जतच्या कातळदरा जंगलात उगम पावलेल्या उल्हास नदीचा काही किलोमीटरनंतरचा प्रवास बारमाही नदीमध्ये होतो आणि ही नदी अनेक महानगरे आणि शहरांना तसेच गावांना पाणीपुरवठा करीत आहे, मात्र गेल्या काही वर्षांत ही नदी प्रदूषणाकडे वाहत आहे. या जीवनवाहिनी असलेल्या नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक तरुण सरसावले आहेत. गतवर्षी सुरू झालेली उल्हास नदी संवर्धनाची मोहीम यशस्वी करण्यासाठी आता अभ्यास दौरेदेखील होऊ लागले आहेत.

उल्हास नदी बचाव कृती समितीमार्फत नुकताच उल्हास नदी अभ्यास दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या एक- दोन वर्षांपासून प्रामुख्याने उल्हास नदीच्या संवर्धनासाठी आणि तिचे प्रदूषण रोखण्यासाठी काम करण्यासाठी तरुण एकत्र आले होते. जो विषय गेल्या वर्षभरापासून विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहचवला जात होता त्याबाबत सखोल अभ्यास करणे शक्य होणार होते. त्यामुळे एकंदर दोन दिवसीय या अभ्यास दौर्‍यात उल्हास नदीची ढासळत चाललेली प्रकृती, तेथील जलचर आणि जलपर्णी याबाबत सखोल माहिती एकत्रित करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न सुरू झाला आहे. या अभ्यास दौर्‍यात कल्याण ते कर्जत परिसरातील पर्यावरण रक्षणासाठीची तळमळ असणारे 30-40 सदस्य सहभागी झाले होते. हे सर्व सदस्य आपल्या परीने उल्हास नदी रक्षणासाठी विविध स्तरावर काम करीत आहेत.

उल्हास नदीच्या माथ्यावर कोंढाणा लेणीच्या बाजूला असलेल्या गावापासून साधारण सात किलोमीटर पुढे उल्हास नदीचा उगम ज्या ठिकाणी झाला तो भाग म्हणजे कातळदरा. हे कातळदरा म्हणजे राजमाची गोमुखातून पाण्याचा ओढा आणि लोणावळा-खंडाळा येथील सह्याद्रीच्या पर्वतरांगांतून वाहत असलेल्या दोन ओढ्यांचा संगम होऊन पुढे मूळ प्रवाहात नदीपात्र निर्माण झाल्याचे निदर्शनास येते. उगम स्थानात उल्हास नदीचे पाणी स्वच्छ आणि नितळ असल्याचे दिसून आले. तेथे त्यासाठी कोणत्याही प्रक्रियेशिवाय हे पाणी आपण पिऊ शकतो. कातळदरा भागातून नदी पुढे खळखळत घनदाट रानावनातून वाहत आहे. या ठिकाणी नदीकिनारी अनेक जलचर तसेच पक्षी, प्राण्यांच्या विविध आवाजांनी हा परिसर अतिशय सुमधूर आणि मनाला शांत करून जातो. नदीपात्रात विविध माशांच्या प्रजाती  पाहावयास मिळतात, तसेच शिंपले हे पात्रात दिसून आले, तर घनदाट झाडी असल्याने माकड आदी प्राणी दिसून आले. ही नदी पुढे जसजसी सरकते किंवा तिचा प्रवाह जसा सुरू आहे तसतशी नदीच्या पात्राची धूप झाल्याचे आढळून आले. नदीपात्राला लागून असलेल्या वनस्पती या आयुर्वेदिक उपचारासाठी मुबलक प्रमाणात उपयुक्त असल्याचे तेथील लोकांकडून सांगण्यात आले. उल्हास नदीचे पाणी किती प्रमाणात आणि कोणत्या भागात दूषित झाले हे पाहण्यासाठी या अभ्यास दौर्‍यात सहभागी तरुणांचा प्रवास 10 किलोमीटरवर पाण्याच्या रंगात, चवीत बदल झाल्याचे अनुभवास मिळत होते. अशा ठिकाणचे नमुने गोळा करण्यात आले आहेत, जेणेकरून प्रदूषणाची पातळी किती तीव्र आहे याचा अभ्यास शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात येईल.

उल्हास नदीला अनेक ऐतिहासिक, भौगोलिक, प्रादेशिक संदर्भ असून या पाण्यामुळे कित्येक कुटुंबांचे पोट भरत आहे.नदीकिनारी अनेक जणभातशेती, फूलशेती, पालेभाजी करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. या नदीला ऐतिहासिक वारसा आहे.कारण 1656 साली उल्हास नदीवरच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभारल्याचे इतिहासकारांचे म्हणणे आहे, तसेच नदीकिनारी अनेक ठिकाणी शिव, मारुतीरायाचे मंदिर असल्याचेही दिसून येते.नदी प्रदूषणास मोठ्या प्रमाणात कारणीभूत असणारे घटक म्हणजे अनेक ठिकाणी किनार्‍यालगत मोठे रिसॉर्ट, हॉटेल्स, गृहप्रकल्प आणि लोकवस्ती वाढत असल्याने नदीपात्रात सांडपाणी सोडलेले दिसून आले. काही ठिकाणी नदीपात्रालगत डम्पिंग ग्राऊंडही आढळून आले. उगम स्थानापासून ते रायताला (कल्याण) ज्या ठिकाणी नदी खाडीत संगम होत आहे. नदिच्या प्रदुषणाबाबत महाराष्ट्र प्रदुषण मंडळाने जे दाव्याला येत्या काळात आव्हान समितीमार्फत दिले जाईल.

या दोन दिवसीय अभ्यास दौर्‍यात पहिल्या दिवशी उगम स्थानापासून कर्जतपर्यंत प्रवास होता. नंतर नेरळ येथील सगुणा बागेत रात्री वास्तव्य झाले. तेथून आम्हा सर्व सदस्यांची व्यवस्था सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्राचे चंद्रशेखर भडसावळे यांच्या वतीने मोफत करण्यात आली, तसेच या मोहिमेत त्यांनी जी मदत लागेल ती पुरविण्याचे आश्वासनही दिले. दुसर्‍या दिवशी पुन्हा प्रवास सुरू झाला तो भिवपुरी येथून नेरळ, शेलू, वांगणी, बदलापूर, अंबरनाथ आणि पुढे कल्याणला समाप्त झाला. येत्या काळात या नदी प्रदूषणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. खेडेगावांना पिण्याच्या पाण्याचे महत्त्वाचे स्त्रोत असलेल्या उल्हास नदीचे चित्र उल्हासनगरसारख्या गटारगंगेत होऊ नये असे जर वाटत असेल, तर वेळीच जागे होणे गरजेचे आहे.

या उल्हास नदी बचाव कृती समितीद्वारे जनजागृती आणि नदी संवर्धनासाठी आग्रही असणारे रवींद्र लिंगायत, अश्विन भोईर, विवेक गंभीरराव, प्रवीण नगरे, निकेत व्यवहारे, निकेश पावशे, अशफाक शेख, योगेश पवार, हर्षल भोईर, बंटी म्हसकर, मुकुंद भागवत, समीर सोहनी, राजेंद्र अभंग, प्रशांत राऊत, स्वप्नील म्हात्रे, रंजन झा यांच्यासह वकील रवींद्र केदार, विलास शिरोसे यांनी या दौर्‍याचे आयोजन केले होते, तर सागर सुर्वे व सुधाकर झोरे यांचे विशेष मार्गदर्शन या

दौर्‍यादरम्यान लाभले.

केशव तरे हे गेल्या वर्षभरापासून उल्हास नदी संवर्धनासाठी वैयक्तिकरीत्या विविध स्तरावर जनजागृती तसेच स्वच्छता अभियान राबवत आहेत. त्यामुळे सदर दौर्‍याची माहिती मिळताच या समितीत स्वतःला जोडून घेत या दोन दिवसीय दौर्‍यात सक्रिय सहभाग घेत आपल्या परिसरातील नद्यांविषयी सखोल माहिती मिळवली, तसेच नैसर्गिक, कृत्रिम, मानवनिर्मित प्रदूषणाने कशा प्रकारे हानी होत आहे याविषयी जाणून घेतले.

-संतोष पेरणे

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply