Monday , February 6 2023

विवेक पाटलांची चौकशी करा : सोमय्या

कर्नाळा बँकेत किमान एक हजार कोटींचा घोटाळा

पनवेल : रामप्रहर वृत्त
शेकाप नेते माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखालील कर्नाळा नागरी सहकारी बँकेत संचालक मंडळाने केलेल्या बेकायदेशीर व अनागोंदी कारभारामुळे 513 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, हा घोटाळा किमान एक हजार कोटी रुपयांचा असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विवेक पाटील यांनी परदेशात पळ काढण्यापूर्वी त्यांचा पासपोर्ट जप्त करावा, तसेच त्यांची अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी व्हावी, अशी मागणी करीत या घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांनी शनिवारी (दि. 18) येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मोठ्या प्रमाणात असलेल्या या घोटाळ्यामुळे एक लाख लोकांवर याचा परिणाम होणार असल्याची चिंताही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
पनवेल मार्केट यार्ड येथे झालेल्या या भरगच्च पत्रकार परिषदेस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, कुंडलिक काटकर आदी उपस्थित होते.
पत्रकारांना माहिती देताना किरीट सोमय्या यांनी पुढे सांगितले की, कर्नाळा बँकेत शेकापच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नावाने 63 बोगस कर्ज खाती तयार करून माजी आमदार विवेक पाटील व त्यांच्या संचालक मंडळाने 513 कोटी रुपये इतका प्रचंड अपहार केला. म्हणून या बँकेचा दिवाळे निघाले. आणखीही अशी खाते असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हा आकडा हजार कोटी रुपयांच्या घरात असेल.
ठेवीदार व खातेदारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाही, मात्र बँकेकडून फक्त आश्वासने, दमदाटी केली जात असल्याने ठेवीदार चिंतेत आहेत. अनेक ठेवीदारांचा या धसक्याने मृत्यूही झालेला आहे. अशा वेळी बँकेने त्यांना योग्य मार्गदर्शन करून वेळेवर त्यांचे पैसे देणे क्रमप्राप्त होते. शेकडो ठेवीदारांनी बँकेत फेर्‍या मारल्या, पण बँकेला त्यांची किंचितही दया आली नाही. उलटपक्षी उडवाउडवीची उत्तरे देऊन ठेवीदारांची वारंवार फसवणूक केली जात आहे. बँकेत घोटाळा झाल्यामुळेच त्यांना ठेवीदारांना त्यांचे पैसे देता आले नाहीत असे सांगून सोमय्या म्हणाले की, ठेवीदारांनी जेव्हा आमच्याकडे संपर्क केला तेव्हा आम्ही त्यांना न्याय देण्याची ग्वाही दिली. त्या अनुषंगाने या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला. कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांच्या ठेवी साधारणपणे जून-जुलै 2019पासून परत मिळणे बंद झाले. आरटीजी/आयएमपीजी बंद झाल्यानंतर काही ठेवीदारांनी आमच्याकडे तक्रारी केल्यामुळे आम्ही माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, सहकार सचिव, सहकार आयुक्त, रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्याशी चर्चा व पत्रव्यवहार करून योग्य मार्ग काढण्याची विनंती केली. रिझर्व बँकेने सहकार खात्यास पत्र पाठवून कर्नाळा बँकेच्या संपूर्ण कर्ज व्यवहाराचे विशेष लेखापरीक्षण करण्याच्या सूचना केल्या. रिझर्व बँकेच्या पत्रानुसार सहकार आयुक्त व निबंधक, महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था, रायगड-अलिबाग यांच्या मार्फत फक्त 63 कर्ज खात्यांची चौकशी केली. जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी त्यांचा चौकशी अहवाल 19 डिसेंबर 2019 रोजी सहकार आयुक्त व निबंधक यांच्या कार्यालयास सादर केलेला आहे. या चौकशी अहवालात अधिकार्‍यांनी 63 कर्ज खात्यांतून 512 कोटी 55 लाख रुपये कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी व अन्य खात्यांमध्ये वर्ग झाल्याचे स्पष्ट केलेले आहे.
कर्नाळा नागरी सहकारी बँक लि., कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट व कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी या तिन्ही संस्थाचे अध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेक पाटील हे आहेत. एकूण कर्ज 633 कोटी 79 लाख रुपये आहे. या कर्जापैकी 81 टक्के कर्ज रक्कम 63 कर्जदारांना दिलेली आहे. बाकी शिल्लक राहिलेल्या कर्ज खात्यांपैकी बहुतांश कर्जखाती बोगस असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्रकरणात मुद्रांक शुल्क विभागाचे कोट्यवधी रुपये बुडवल्याचे निदर्शनास आले आहे. या चौकशी अहवालानुसार व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960मधील तरतूदीनुसार कर्ज भरण्याची जबाबदारी ही कर्जदार, जामिनदार व कर्ज मंजूर करणारे संचालक मंडळ यांची आहे, मात्र बोगस कर्जदार, जामिनदार व संचालक यांना विवेक पाटील कागदी घोडे नाचवून या संपूर्ण व्यवहाराची जबाबदारी ही माझी (विवेक पाटील) आहे असे सांगत आहेत, हे संशयास्पद आहे.
ऑगस्ट 2019पासून कर्नाळा बँक पदाधिकारी, विवेक पाटील (माजी आमदार) हे ठेवीदारांना फक्त आश्वासन देत आले आहेत. कोणत्याही ठेवीदारास त्यांनी पैसे परत दिलेले नाहीत. चौकशी अहवालावरून बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील व बँकेच्या संचालक मंडळाने 512 कोटी 55 लाख रुपयांचा अपहार केल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे राज्याच्या सहकार खात्याने व संबंधित प्राधिकरणाने म.स.सं. अधिनियम 1960 व त्याखालील नियम 1961मधील तरतुदीनुसार बँकेचे पदाधिकारी, संचालक मंडळ व अधिकारी यांच्यावर गुन्हे नोंदवून त्यांची मालमत्ता जप्त करून ठेवीदारांचे पैसे परत करावे. इतक्या मोठ्या प्रमाणात रकमेचा अपहार करून ते पैसे कुठे गुंतवले अथवा वापरले याची माहिती विवेक पाटील हेच देऊ शकतात. मी या घोटाळा प्रकरणासंदर्भात सहकारमंत्र्यांशी स्वतः बोललो आहे. ताबडतोब कारवाई व्हावी, अशी आमची आग्रही मागणी आहे. विवेक पाटील पळून जाण्याची मला भीती वाटते. त्यामुळे त्यांचा पासपोर्ट जप्त करावा, तसेच त्यांच्या व परिवाराच्या सर्व संस्था अथवा कंपन्यांची ईडीमार्फत चौकशी करावी व त्यांच्यावर एमपीआयडी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोमय्या यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून पत्रकार परिषदेत केली.

आम्हाला राजकारण करायचे नाही. राजकारणात ज्यांना हरवायचे होते त्यांना हरवले आहे. सर्वसामान्य ठेवीदारांचे पैसे मिळाले पाहिजेत, हाच आमचा मूळ उद्देश आहे. कर्नाळा बँकेचे चेअरमन विवेक पाटील यांनी ग्रामपंचायतींनाही सोडले नाही. अनेक ग्रामपंचायतींचे कोट्यवधी रुपये बँकेत अडकलेत. ठेवीदारांचे पैसे ताबडतोब मिळावेत, अशी आमची आग्रही मागणी आहे. त्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी.                
-आमदार महेश बालदी, अध्यक्ष, ठेवीदार संघर्ष समिती

ठेवीदारांना बँक वेळेवर पैसे देईल, अशी आशा होती. बँकेत वारंवार फेर्‍या मारून ठेवीदार थकले, मात्र पैसे अद्यापही मिळाले नाहीत. घोटाळा करून सर्वसामान्यांचे पैसे स्वतःच्या खिशात घालण्याचे काम करणारे विवेक पाटील व संबंधितांवर कडक कारवाई करावी.
-आमदार प्रशांत ठाकूर, कार्याध्यक्ष, ठेवीदार संघर्ष समिती

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply