पनवेल: वार्ताहर
पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) घडली. या आगीमध्ये पाच वाहने जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणतीही जीवित हानी नाही झाली.
कोळखे गावाजवळ महिंद्रा हे चारचाकी वाहने विक्रीचे शोरूम आहे. या शोरूममधून सायंकाळी साडेसात च्या सुमारास धूर येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनाला आले. त्यानी तात्काळ याची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर त्वरित पनवेल महानगरपालिका आणि सिडको अग्निशमन दल त्या ठिकाणी पोहोचले. तो पर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. अग्निशमन दलाच्या दोन वाहनांनी आग आटोक्यात आणली. या घटनेत पाच महागड्या गाड्या जळून खाक तर एक गाडी अर्धवट जळाली. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याची माहिती पनवेल महापालिकेचे अग्निशमन विभागाचे प्रमुख हरिदास सूर्यवंशी यांनी दिली. आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून, अधिक तपास पनवेल शहर पोलिस करत आहेत.