आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून पनवेल महापालिकेच्या वतीने वडाळे तलावाजवळ शुक्रवारी (दि. 21) भव्य स्वरूपात योग दिवस साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने पतंजली योग समितीचे भारतीय नौसेनेचे निवृत्त लेफ्टनंट राम पलट यादव यांनी या वेळी उपस्थितांना योगासने आणि प्राणायम, ध्यान याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यानी सहभागी होत योगासने केली.
भारताच्या प्राचीन संस्कृतीमध्ये योगाला प्रचंड महत्त्व राहिले आहे. योगामुळे शरीर, मन दोन्हीही सुदृढ बनते. या अनुषंगाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014मध्ये 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा व्हावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत समाविष्ट असलेल्या 193 देशांपैकी 175 देशांनी या प्रस्तावाला होकार दिला. नंतर यावर सविस्तर चर्चा होऊन डिसेंबर 2014मध्ये या दिनाला संपूर्ण मान्यता प्राप्त झाली, तर 21 जून 2015 रोजी पहिला जागतिक योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
केवळ भारत देशातच नाही, तर सार्या जगाला एव्हाना योगाचे महत्त्व पटले आहे. म्हणूनच 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार पनवेल महापालिकेच्या वतीने आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळे तलावाजवळ हा दिन साजरा करण्यात आला. या योग दिनाच्या कार्यक्रमाला पावसाळी वातावरण असूनदेखील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
या वेळी पंतजली योग समितीचे राम पलट यादव यांनी अर्ध चक्रासन, ताडासन, वक्रासन, भुजंगासन, पवन मुक्तासन, अर्ध हलासन असे योगाआसानाचे विविध प्रकार शिकवून त्याचे फायदे सांगितले तसेच प्राणायमामध्ये कपालभाती, भ्रामरी, अनुलोम विलोम याबद्दल मार्गदर्शन केले. याबरोबरच ध्यानामुळे शरीराला होणार्या लाभाबद्दल सविस्तर माहिती दिली.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, संदीप पाटील, विकास घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, अतिरीक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त कैलास गावडे, डॉ. वैभव विधाते, बाबासाहेब राजळे, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, घनकचरा आणि स्वच्छता विभागप्रमुख अनिल कोकरे, भारत स्वाभिमान ट्रस्टचे जिल्हाप्रमुख रामबाबू मोरे, पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी रवींद्र मोरे, योग संदेश प्रभारी अल्का अव्हाड, महामंत्री सरिता ठाकूर, भारत स्वाभिमान ट्रस्टचे सह जिल्हा प्रभारी राजेंद्र सिंह, पनवेल ब्रम्हाकुमारीजच्या इन्चार्ज ताराबेन, डॉ. शुभदा नील, महिला मोर्चाच्या सपना पाटील, आर.पी. यादव, डॉ. समुद्रे, श्वेता शेट्टी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस चिन्मय समेळ, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, अक्षय सिंग, वरुण डांगर, शुभम कांबळे यांच्यासह पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांचे सदस्य आणि नागरिकांनी सहभाग घेतला.
दरम्यान, योग दिनाचे औचित्य साधून स्वच्छ, सुंदर आणि सदृढ पनवेल बनविण्याच्या दृष्टीने स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत घनकचरा आणि आरोग्य विभाग, माझी वसुंधरा अंतर्गत गारबेज टू गार्डन, झिरो वेस्ट, गांडूळ खत, कंपोस्टिंग, ओला कचरा आणि सुका कचरा वर्गीकरण अशी विविध प्रकारची माहिती देणारे प्रात्यक्षिके मांडण्यात आली होती. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या स्टॉलला भेट देऊन पालिका करीत असलेल्या कामाची माहिती घेतली. भारत विकास परिषदेकडून कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.