Breaking News

खालापूरजवळ कार अपघातात अभिनेत्री शबाना आझमी जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर हद्दीत प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कारला अपघात होऊन त्या व त्यांचा कारचालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि. 18) दुपारी 4च्या सुमारास झाला. पोलीस व अन्य यंत्रणांनी जखमींना रुग्णालयात
दाखल केले.
प्रसिद्ध सिनेअभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून टाटा सफारी कारने (एमएच 02 सीझेड 5385) लोणावळ्याला चालल्या होत्या. त्यांची कार खालापूर टोलनाक्याजवळ आली असता, चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही कार समोरून जाणार्‍या मालवाहू (एमएच 9 जीयू 8010) ट्रकवर मागून आदळली. या अपघातात शबाना आझमी यांच्या डोक्याला व डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्या कारचा चालकही जबर जखमी झाला आहे. शबाना यांच्यासोबत कारमध्ये त्यांचे पती व गीतकार जावेद अख्तरही होते, परंतु अपघातात त्यांना कोणताही इजा झालेली नाही, असे सांगण्यात आले.
महामार्गावरील आयआरबी यंत्रणा, डेल्टा फोर्स व मदत यंत्रणेने शबाना व कारचालकाला तत्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल केले, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, अधिक उपचारासाठी शबाना यांना मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. खालापूर पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित  पाटील, पोलीस निरीक्षक काईंगडे, तसेच महामार्गावरील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी होते. अधिक तपास खालापूर पोलीस करीत आहेत.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply