मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील कोटोश्वरी परिसरात शुक्रवारी रात्री बिबट्या आल्याच्या अफवेने भीतीचे वातावरण पसरले होते. ही माहिती मिळताच वन विभागाचे आणि वनजीव विभागाचे अधिकारी-कर्मचार्यांनी घटनास्थळी येऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली असता आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचा वावर नसल्याचे दिसून आले. तसेच बिबट्याच्या पाऊलखुणाही येथे दिसल्या नाहीत.
काहीही न दिसल्यामुळे सुतळी फटाके फोडण्यात आले, जेणेकरून कोणताही वन्यप्राणी असेल तर तो पळून जाईल. सकाळी पुन्हा पहाटे येऊन परिसराची पाहणी केली असता त्या ठिकाणी बिबट्याच्या नाही तर रानडुकराच्या पाऊलखुणा आढळून आल्या. सदरची पाहणी वनक्षेत्रपाल प्रशांत पाटील व त्यांचे सहकारी तसेच वन्यजीव फणसाड अभयारण्याचे वनक्षेत्रपाल राजवर्धन भोसले यांच्या सहकार्यांनी केली.
वनक्षेत्रपाल प्रशांत पाटील यांनी सांगितले की, मुरूडच्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. आम्ही सर्व परिसर पिंजून काढला आहे. बिबट्याचे कोणतेही संकेत मिळत नसल्याचे या वेळी त्यांनी स्पष्ट केले.