Breaking News

घबराट नको, दक्षता हवी!

करोना हा विषाणू प्रामुख्याने श्वसनयंत्रणेवर हल्ला करतो. त्यामुळे ताप, कफ, श्वास घेण्यास त्रास, तसेच फुप्फुसामध्ये संसर्ग अशी लक्षणे आढळून येतात. सौम्य लागण झाली असल्यास फ्लु किंवा सर्दीसारखीच लक्षणे दिसू शकतात. विषाणूची लागण झाल्यानंतर लक्षणे दिसण्यास दोनएक आठवड्यांचा काळही लागू शकतो. अशा वेगाने पसरणार्‍या विषाणूच्या संदर्भात घबराटीऐवजी जागरूकता व दक्षता बाळगल्यास फैलाव रोखण्यास मदत होऊ शकते.
करोना विषाणूमुळे होणार्‍या संसर्गाने जगभरातील आरोग्य यंत्रणांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या नव्या विषाणूचा चीनमधील वुआन प्रांतात फैलाव सुरू झाल्याबरोबरच अगदी अमेरिकेपासून भारतापर्यंत जगभरातील आरोग्य यंत्रणांनी त्याची दखल घेतली. आतापावेतो चीनमध्ये या विषाणूच्या संसर्गामुळे 106 जणदगावले असून साडेचार हजार जणांना याची लागण झाल्याचे समजते. चीनमध्ये ज्या प्रांतात या विषाणूचा फैलाव आढळून आला आहे तिथे प्रशासकीय यंत्रणेने शाळा बंद केल्या असून बससारख्या सार्वजनिक वाहतूक सेवा, गर्दी जमणारे सार्वजनिक कार्यक्रम यावर सरकारने बंदी आणली आहे. विषाणूचा फैलाव रोखण्याचा निकराचा प्रयत्न म्हणून तेथील यंत्रणेने ही पावले उचलली आहेत. अलीकडच्या काळात चीनला जाऊन आलेल्या काही जणांना करोना विषाणूची लागण झाल्याच्या काही केसेस अमेरिकेतही आढळल्याने जगभरातच या संदर्भात दक्षता घेतली जाते आहे. भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशाला अशा विषाणू फैलावाच्या संदर्भात कायमच अधिक सावधगिरी बाळगावी लागते. त्यामुळेच चीनमधील फैलावाचे वृत्त येताच आपली आरोग्य यंत्रणाही वेगाने कामाला लागली असून ठिकठिकाणी काही संशयित रुग्ण इस्पितळांमध्ये दाखल झाले आहेत. नवी दिल्लीतील राम मनोहर लोहिया इस्पितळात असे तीन संशयित रुग्ण सोमवारपासून दाखल आहेत. त्यांच्या विविध तपासण्या सुरू असून अद्याप त्यांना लागण झाल्याचे निश्चित झाले नसले तरी खबरदारीची उपाययोजना म्हणून त्यांना स्वतंत्र खोल्यांमध्ये ठेवून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सोमवारपर्यंतची आकडेवारी पाहिली तर देशभरात अलीकडच्या काळात चीनहून आलेल्या 33 हजार 552 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. आपली आरोग्य यंत्रणा झपाट्याने कामाला लागली असून पुरेशी खबरदारी घेतली जाते आहे याचे हे निदर्शक आहे. प्रारंभीच्या काळात केरळ व महाराष्ट्रात काही जणांना खास निरीक्षणाखालीही ठेवण्यात आले होते. देशात अद्याप या विषाणूची लागण झालेली एकही केस आढळलेली नाही, असे प्रतिपादन यापूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केले असून सात संशयित रुग्णांचे नमुने तपासणीकरिता पुण्याला पाठवण्यात आले आहेत. अमेरिकेतही अलीकडच्या काळात चीनहून परतलेल्या लोकांची संख्या मोठी असल्यामुळेच तिथे कुणा न कुणाला या विषाणूची लागण झालेली असण्याची शक्यता तेथील आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आली आहे. आपल्याकडेही त्याच धर्तीवर दक्षता घेतली जात असून अगदी 1 जानेवारीपासून चीनमधून आलेल्या प्रवाशांची यादी विमानतळ प्राधिकरणाकडून घेऊन त्या प्रवाशांची चौकशी केली जाणार आहे. या विषाणूची लागण झाल्यास ताप, सर्दी, अंगदुखी अशी सामान्यत: आढळणारी लक्षणे दिसत असल्यामुळे त्याबद्दल जनतेमध्ये घबराट पसरली आहे. परंतु चीनखेरीज अन्य देशांमध्ये हा विषाणू आढळला असला तरी चीनप्रमाणे तेथे त्याचा फैलाव होताना आढळलेले नाही असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे हेदेखील ध्यानात घेतले पाहिजे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply