भारतातील एक विश्वसनीय सेवा म्हणून पाहिल्या गेलेल्या भारत संचार निगम लिमिटेडच्या दूरध्वनी आणि इंटरनेट सेवेचे महाडमध्ये तीनतेरा वाजले आहेत. ही सेवा महाडकरांना कधीतरी मिळत असुन आमावस्या पौर्णिमेला मिळणार्या या सेवेमुळे महाडकर कमालीचे संतप्त झाले आहेत. याचा परिणाम सर्व शासकीय कार्यालये, बँका आणि घरगुती, व्यावसाईक दूरध्वनी ग्राहकांवर जाणवू लागला आहे. एकीकडे इंटरनेट सुविधा ठप्प असतानाच रायगडमधील जवळपास 260 कर्मचार्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. याचा परिणाम देखील दूरध्वनी सेवेवर भविष्यात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाडमधील बीएसएनएलची सेवा गेली अनेक महिने खंडित राहिल्याने नागरिकांमध्ये याबाबत चर्चेला उधाण आले आहे. महाडसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात भारत संचार निगम लिमिटेडची सेवा सातत्याने खंडित होत आहे, मात्र महाडमध्ये खंडीत होण्याचे प्रमाण मात्र जास्त आहे. मोबाइलला नेटवर्क मिळत नसल्याने बीएसएनएल मोबाइल धारक कमालीचे संतापले आहेत. बहुतांश ग्रामीण भागात भारत संचार निगमचे मोबाइल ग्राहक आहेत. पूर्वी असलेले घरगुती दूरध्वनी जवळपास 90 टक्के बंद पडले आहेत. त्याऐवजी बीएसएनएलचा मोबाइल वापर सुरु झाला. मात्र भारत संचार निगमच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामीण भागात या सेवेवर देखील नाराजी व्यक्त झाली. याचा फायदा खाजगी कंपन्यांनी घेवून ग्रामीण भागात खाजगी मोबाईल सेवा भक्कम झाल्या आणि बीएसएनएलची मोबाइल ग्राहक संख्या देखील घटली गेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाड शहरातील खाजगी आणि सरकारी बँकांतून सर्व कारभार ठप्प झाला आहे. शिवाय सरकारी कार्यालयातील कारभार देखील मंदावला आहे.
ग्रामीण भागातून शहरात शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणार्या नागरिकांना यामुळे काम अपूर्ण ठेवूनच परतावे लागत आहे. शासकीय कार्यालयातून भारत संचार निगम लिमिटेडचीच सेवा प्राधान्याने वापरली जात आहे. यामुळे महसूल विभाग, सेतू कार्यालय, भूसंपादन, आदी कामांसाठी खोळंबा होत आहे. ग्रामीण भागात इंटरनेट नसल्याने रेशनिंगवर धान्य मिळणे देखील कठीण होवून बसले आहे. पुरवठा विभागाने पुरवलेल्या पॉस मशीनला इंटरनेट नसल्याने या मशीन चालत नाहीत यामुळे धान्य मिळवण्यास नागरिकांना वाट पहावी लागत आहे. बँकांमधून कामे होत नसल्याने नागरिकांच्या रोषाला बँक कर्मचार्याला सामोरे जावे लागत आहे. शहरातील एटीएम सुविधा देखील यामुळे सातत्याने बंद ठेवली जात आहे. इंटरनेट नसल्याने पैसे मिळत नसल्याची तक्रार केली जात आहे. हीच अवस्था जमीन, घर, खरेदी-विक्री नोंद होणार्या नोंदणी कार्यालयात आहे. याठिकाणी गेली आठवडाभर नागरिकांना ताटकळत बसावे लागत आहे.
रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध रस्त्यांच्या कामामध्ये भारत संचार निगम लिमिटेडच्या केबलला हानी पोहचत आहे. गेले काही दिवस आणि महिने हा त्रास सुरु असला, तरी भारत संचार निगम लिमिटेड देखील या दृष्टीने ठोस कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे. भारत संचारचे अधिकारी आणि कर्मचारी नादुरुस्त केबल जोडून सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र केबल जोडून होताच अन्य ठिकाणी हि केबल तुटली जात आहे. भारत संचार निगम ज्या केबलद्वारे इंटरनेट सुविधा पुरवण्याचे काम करते ती ओएफसी केबल वारंवार खोदकामात तोडली जात आहे. मुंबई-गोवा महामार्ग, पेण-पनवेल, पेण-खोपोली या प्रमुख मार्गांवर रस्त्यांची कामे सुरु आहेत. महाडजवळ मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण काम आणि महाबळेश्वर-पुणे दरम्यान तसेच महाड औद्योगिक क्षेत्रात गेली काही दिवस वारंवार केबल तोडली जात आहे. यामुळे इंटरनेट सेवा ठप्प आहे. सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत शिवाय अंतर्गत कामे देखील सुरु असल्याने हा त्रास सुरु असल्याचे भारत संचार निगमच्या प्रशासनाने सांगितले.
एकीकडे शासन डिजिटल यंत्रणेवर भर दिले जात आहे, मात्र दुसरीकडे इंटरनेट सुविधेचा बोजवारा वाजत असल्याने डिजिटल यंत्रणेचे देखील तीन तेरा वाजले आहेत. भारत संचार निगम लिमिटेड मधील कर्मचार्यांना स्वेच्छा निवृत्ती घेण्यासाठी केंद्र शासनाने सांगितले आहे. त्यानुसार महाडमधील 21 कर्मचार्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. यामध्ये महाड मंडळ कार्यालयातील 11 कर्मचार्यांचा समावेश आहे. तर संपूर्ण रायगडमध्ये जवळपास 200 च्या वर कर्मचार्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. शनिवारी या कामगारांनी आणि कर्मचार्यांनी शेवटचा दिवस म्हणून कार्यालयात हजेरी लावून काम केले. महाड मंडळ कार्यालयातील जवळपास 11 कर्मचार्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होणार आहे. कर्मचारी कपात करून वेतन खर्च वाचवण्याचा प्रयत्न बीएसएनएल प्रशासनाने केला आहे. मात्र याचा परिणाम सेवेवर होणार असल्याचे भविष्यात दिसून येण्याची शक्यता आहे.
मुंबईपासून माणगावपर्यंत बीएसएनएल मोबाइल व्यवस्थित चालतात, मात्र महाडमध्ये आल्यावरच ही सेवा का खंडीत होते, असा प्रश्न महाडकरांना पडला आहे. राजकीय अनास्थेमुळेच महाडकरांनचे हे प्रश्न मिटत नाहीत, असा आरोप आता जनतेमधून होऊ लागला आहे. स्वस्त आणि दुरखेड्यातही रेंज मिळणारी बीएसएनएलची मोबाइल आणि इंटरनेट सेवा नागरिकांना मिळणे हा त्यांचा आधिकार आहे आणि ती मिळवून देणे प्रशासनाचे काम आहे.
-महेश शिंदे