Breaking News

बिरवाडीमधील मंदिर सभागृहाच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले

महाड : प्रतिनिधी : तालुक्यातील बिरवाडी पंचक्रोशीत जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीदेव बहिरी मंदिर सभागृहाच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याची घटना बुधवारी (दि. 3) घडली. सुदैवाने या घटनेमध्ये मोठी दुर्घटना टळली आहे, ग्रामस्थांची सभा झाल्यानंतर या ठिकाणी स्लॅबचे प्लास्टर कोसळले. श्रीदेव बहिरी मंदिराच्या सभागृहाचे काम जिल्हा नियोजन विकास निधी विकास क श्रेणी पर्यटन स्थळ कार्यक्रमांतर्गत सुमारे 32 लाख रुपयांचा निधी खर्च करून मार्गी लावण्यात आले होते. 20 फेब्रुवारी 2014 रोजी उद्घाटन करण्यात आले होते, मात्र सदरचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्यानेच ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. श्रीदेव बहिरी देवस्थानचे अध्यक्ष अरुण तुकाराम पवार यांच्याजवळ भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता, श्रीदेव भैरी देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने मंदिर सभागृहाच्या स्लॅबच्या प्लॅस्टरचे दुरुस्तीचे काम तत्काळ पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षे पत्राशेड उभारण्यात आली नसल्याने पावसाचे पाणी मंदिर सभागृहाच्या स्लॅबवर साठल्याने स्लॅबचे प्लॅस्टर कोसळल्याची घटना घडली होती, मात्र श्रीदेव बहिरी देवस्थान ट्रस्ट व बिरवाडी ग्रामस्थांनी दुरुस्तीचे काम पूर्ण करून मंदिर व सभागृह यात्रा उत्सवाकरिता सज्ज केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply