Breaking News

महाराष्ट्रातील लोकपर्यटन

देवस्थानांना भेटी हा पर्यटनाचा एक महत्त्वाचा भाग. पाहूया आपल्या मातीतील देवस्थळे. महाराष्ट्रात प्रत्येक 12 कोसावर भाषा बदलते. जशी भाषा बदलते त्याच पद्धतीने त्या भाषेचा लहेजा बदलतो. प्रदेशपरत्वे महाराष्ट्राचे मुख्य पाच विभाग आपल्याला बघावयास मिळतात. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्र म्हणजेच मराठवाडा होय.

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणारचे सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले असून सभोवताली उंच डोंगराच्या कडा, आत देवीचे मंदिर, गरम पाण्याचा झरा, लोणारची धार पाहण्यासाठी लोक देशपरदेशातून येतात. हे धारेचे पाणी पवित्र काशीवरून आलेले आहे, असे जुनेजाणते सांगतात. मुबलक पाण्याचा स्रोत असल्याने सीता न्हाणी रामकुंड अशा ठिकाणी हजारो लोक आंघोळीसाठी येतात.

लोणारप्रमाणेच विदर्भात आपणाला परतवाडच्या सातव्या पर्वतरांगेत वसलेले मुक्तागिरी हे जैन धर्मियांचे श्रद्धास्थान महावीरांचे संगमरवरी शिल्पात मोठमोठ्या मूर्ती आपणास पाहावयास मिळतील. बाजूलाच चिखलदरा हा थंड हवेच्या ठिकाणाचा अतिशय निसर्गरम्य प्रदेश. तसा विदर्भ आणि मराठवाडा सतत दुष्काळाच्या खाईत असतो. असे असूनसुद्धा चिखलदर्‍याने लोकांना आल्हाददायक सुख उपलब्ध करून दिले आहे. बाबा आमटेंचं आनंदवन त्यातल्या त्यात मुख्य पर्यटनाचे आकर्षण केंद्र आहे. आदिवासींचं, कुष्ठरोग्यांचं आणि अंधांचं संगोपन बाबा आमटेंनंतर आता प्रकाश आमटे, मंदा आमटे करीत आहेत.

विदर्भाप्रमाणेच आपण मराठवाड्याचा विचार केल्यास जागतिक पातळीवरच्या अजिंठा येथील बौद्ध लेणी, तर वेरूळची कैलास लेणी आपणाला खजुराहोची आठवण करून देते. काळ्या शिल्पात या लेणींचं काम कलावंतांनी केले.म्हणूनच आज परदेशातून पर्यटक आले तर ते अजिंठा- वेरूळ लेण्यास भेट देतात. तिथे बाजूलाच वेरूळमध्ये घृष्णेश्वराचे हेमाडपंथी दिव्य मंदिर, तर दौलताबादला उपडा मारोती पर्यटक आणि भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. राजाराम देवरायच्या कारकिर्दीत दौलताबादचा किल्ला उंच डोंगरात निसर्गाच्या सान्निध्यात मराठवाड्याचा अभिमान उंचावताना आपल्याला दिसतो. लोकसंस्कृतीची पाळेमुळे मराठवाड्यात खोलवर रोवलेली आपणास दिसतात. संतपरंपरेतील संत एकनाथ महाराजांनी याच देवगिरी किल्ल्यात जनार्दन महाराजांकडून संत परंपरेचे प्रशिक्षण घेतले.

संभाजीनगर जिल्ह्यात अनेक सांस्कृतिक क्षेत्रे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या परिसरात ज्ञानदानाच्या कार्याबरोबरच बौद्धलेणी, संभाजी महल, गोगाबाबा आणि बिबीचा मकबरा ही पर्यटनस्थळे पाहावयास मिळतात. बिबीचा मकबरा हा आग्रा येथील ताजमहलची प्रतिकृती आहे म्हणून त्याला मिनी ताजमहल म्हणूनही ओळखले जाते. बावन दरवाज्याचे शहर म्हणून संभाजीनगरची

ख्याती आहे.

इथेच पवनचक्की आणि खंडोबाचं जागृत तीर्थक्षेत्र आहे व आई भवानीच्या साडेतीन

शक्तिपीठांपैकी दोन शक्तिपीठे अनुक्रमे तुळजापूरची भवानी आणि माहूरची रेणुका या ठिकाणी लाखो भाविक कुळधर्म कुळाचारानुसार गोंधळ जागरणाचे विधी पार पाडतात. मराठवाड्याप्रमाणे कोकणाला समृद्ध निसर्गकिनारा लाभला असून समुद्राच्या मधोमध छत्रपती शिवाजी महाराजकालीन मुरूड-जंजिरासारखा तटबंदीतील किल्ला पर्यटनासाठी

खुला आहे.

कोकण नैसर्गिकदृष्ट्या अतिशय समृद्ध असून अनेक लोक समुद्रकिनारी फिरण्यासाठी येतात आणि दशावतार, जाखडी या कलांचा आस्वाद घेतात. कोकणाप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र हा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणाने नावारूपाला आलेला प्रांत. पर्यटकांना कुलू मनालीला जाणे शक्य होत नसल्याने

महाबळेश्वर हेच जणू आपले कुलू मनाली आहेत या आविर्भावात पर्यटक सैर करताना दिसतात. खान्देशात कानबाईची जत्रा, वणीची सप्तशृंगी, नंदुरबारचा आदिवासी भूभाग, काळारामाचे मंदिर आणि पंचवटीसारख्या ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.

मुंबई इलाखा म्हणजे महाराष्ट्राची राजधानी. ही मुंबईनगरी कोळी लोकांनी समुद्राच्या बेटावर वसवली. मुंबईत बोरिवलीला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, गोराईचा पॅगोडा, कान्हेरी गुंफा, नालासोपार्‍याची बौद्धलेणी, भाऊचा धक्का, गेट वे ऑफ इंडिया, उंच इमारती हे जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. महाराष्ट्राची संस्कृती ताठ मानेने आज या साधनसामुग्रीच्या बळावर उभी राहिल्याचे दिसत आहे.

– डॉ. गणेश चंदनशिवे

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply