अलिबाग : प्रतिनिधी
केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. शिक्षण आणि कौशल्य विकास यावर आधारित हे धोरण आहे. देशात कुशल मनुष्यबळ तयार करणे, हा त्या मागचा हेतू आहे. त्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असेल. त्यामुळे शिक्षकांनी नविन शैक्षणिक धोरण समजून घेऊन नवीन बदल आत्मसात केले पाहिजेत, असे मत कौशल्य विकास मार्गदर्शक विनायक जोगळेकर यांनी अलिबाग येथे व्यक्त केले. चेंढरे-अलिबाग येथील चिंतामणराव केळकर विद्यालयात केंद्र सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत विनायक जोगळेकर उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. या वेळी व्यवसाय मार्गदर्शक माधुरी लेले, मार्कस पारखे, प्रा. अविनाश ओक, दत्ता खानविलकर एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष अमर वार्डे यांच्यासह शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते. नविन शैक्षणिक धोरणात प्रचलित शिक्षण पद्धतीत मोठा बदल केला जाणार आहे. शिक्षण आणि कौशल्य विकास एकत्रपणे दिले जाणार आहे. औद्योगिक गरजा लक्षात घेऊन कौशल्य विकास अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास करणे, त्यांच्यात आत्मविश्वास वाढवणे, देशात कुशल मनुष्यबळ तयार करणे हा त्यामागचा हेतू आहे. शिक्षण हे पुस्तकांपुरते मर्यादित राहणार नसून ते व्यवसायाभिमुख कौशल्य विकासावर अवलंबून असणार आहे. ज्यामुळे शिक्षणाची व्याप्ती पुस्तकाबाहेरही वाढणार आहे. रोजगारक्षम शिक्षण पद्धतीवर आगामी काळात भर दिला जाणार आहे. हा बदल लक्षात घेऊन शिक्षण क्षेत्रात होणारे बदल आत्मसात करायला हवेत, असे विनायक जोगळेकर म्हणाले. या वेळी माधुरी लेले आणि मार्कस पारखे यांनीदेखील शिक्षकांना मार्गदर्शन केले. प्रा. अविनाश ओक यांनी आभार मानले.