Breaking News

मागील लोकसभा निवडणुकीत ’नोटा’ला 60 लाख मते; मतदारांची उद्विग्नता

मुंबई ः प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. विविध पक्ष आणि पक्षांचे उमेदवार प्रचारासाठी गावोगावी फिरत आहेत. मतदानापूर्वी सर्वच पक्ष विविध प्रकारे मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतात. आपल्या पक्षाचे जाहीरनामे वाचून दाखवतात. असे असतानादेखील अनेक ठिकाणी ‘नोटा’ अर्थात ’नन ऑफ अबाऊ’ या पर्यायाचा मतदानात अधिक वापर झाल्याचे 2014च्या निवडणुकीत दिसून आले आहे. गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ’नन ऑफ अबाऊ’ या पर्यायाचा वापर करण्यात आला. त्यावेळी 83.41 कोटी मतदारांपैकी 55.38 कोटी (66.4 टक्के) मतदारांनी 543 मतदारसंघांसाठी मतदान केले होते. यापैकी 60 लाख मतदारांनी ’नोटा’चा पर्याय निवडला होता. एकूण मतदारांपैकी याचे प्रमाण 1.1 टक्के आहे. 2014मध्ये ‘नोटा’ला तामिळनाडूमधून निलगिरी मतदारसंघातून सर्वाधिक 46 हजार 559 मते मिळाली होती, तर सर्वात कमी 123 मते लक्षद्वीप मतदारसंघात पडली होती.

-आदिवासी भागातही ‘नोटा’च्या पर्यायाला सर्वाधिक पसंती 2014 मधील लोकसभा निवडणुकीत ज्या 10 जागांवर सर्वाधिक नोटाचा वापर झाला, यामध्ये 9 जागा अदिवासीबहुल आहेत. यातील सात जागा 50 टक्के आदिवासी मतदार असलेल्या होत्या. यामध्ये तामिळनाडूमधील निलगिरी मतदारसंघात सर्वाधिक 46,559 मते नोटाला पडली होती. त्यापाठोपाठ ओडिशामधील नबरंगपूरमधून नोटाला 44 हजार 408, छत्तीसगडमधील बस्तरमधून 38772, राजस्थानमधील बांसवाडा येथे 34,404, ओडिशाच्या कोरापूटमध्ये 33,232, छत्तीसगडमधील राजनांदगावमध्ये 32, 384, गुजरातमधील दाहोत येथे 32,302, छत्तीसगडमधील कांकेरमध्ये 31,917 आणि सरगुजामध्ये 31,104 आणि मध्य प्रदेशातील रतलाममध्ये 30,364 मते नोटाला पडली होती. 2014मध्ये 543 मतदारसंघापैकी 293 जागांवर नोटा पहिल्या पाचमध्ये होते, तर 44 जागांवर नोटा तिसर्‍या क्रमांकावर होते. 502 जागांवर नोटा टॉप टेनमध्ये होता.

Check Also

शेकापच्या धामणी आणि धोदानी गावातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांची रविवारी (दि.20)उमेदवारी …

Leave a Reply