Breaking News

कर्नाळा बँक घोटाळा ः विवेक पाटील यांची उच्च न्यायालयात माघार; मुक्काम तुरूंगातच!

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या सुमारे 543 कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी दाखल केलेला अर्ज गुरुवारी (दि. 6) मागे घेतला. या वेळी विवेक पाटील यांच्या वकिलांनी जामिनासाठी उपस्थित केलेले मुद्दे न्यायाधीश एन.आर. बोरकर यांनी खोडून काढले. त्यामुळे जामीन अर्ज फेटाळला जाईल या भीतीने विवेक पाटीलांनी माघार घेतली.
यापूर्वी विवेक पाटील यांचा जामीन अर्ज पनवेलचे जिल्हा न्यायाधीश जयराज वडणे यांनी फेटाळला होता. त्याला अ‍ॅड. राहुल ठाकूर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. सुनावणीदरम्यान त्यांनी वैद्यकीय कारण, जप्त केलेली मालमत्ता घोटाळ्याच्या किमतीपेक्षा जास्त तसेच साडेतीन वर्षांपेक्षा जास्त काळ तुरूंगात असल्याने विवेक पाटील यांना जामीन मंजूर करावा, अशी विनंती केली. त्यावर बँकेचे खातेदार के.ए. म्हात्रे यांच्या वतीने अ‍ॅड. सौरभ बुटाला आणि अ‍ॅड. चेतन जाधव यांनी जोरदार युक्तिवाद केला.
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्तींनी वैद्यकीय कारणास्तव तसेच विवेक पाटील यांच्या जप्त मालमत्तेची किंमत ही घोटाळ्यापेक्षा जास्त असली तरी गुन्ह्याचे गांभीर्य पाहता जामीन देता येणार नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर हे अपिल फेटाळण्यापूर्वी अर्ज मागे घेण्याची संधी देतो, असे सांगितले. त्यावर वकिलांनी पाटील यांचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे त्यांचा मुक्काम तुरूंगातच असणार आहे.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply