लग्न सोहळ्यात जसे धवळारीन गाण्यांना महत्त्व आहे, त्याचप्रमाणे बायांच्या गाण्यांनाही महत्त्व आहे. आधुनिक व तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक सण, व्रत किंवा पूर्वापार काळापासून चालत आलेल्या पद्धती लोप पावत असताना बायांच्या गाण्यांची एक परंपरा टिकवून ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न पनवेल तालुक्यातील पोयंजे येथील युवकांनी सुरू ठेवला आहे. विशेष म्हणजे वाडवडिलांचा वारसा जपण्याचे आणि ते कार्य पुढे नेण्याचे वाखाणण्याजोगे काम त्यांच्याकडून सुरू आहे.
देवी येणे किंवा त्याचा दुसरा अर्थ असलेल्या बाया येणे ही एक आपल्या परंपरेतील रूढी आजसुद्धा कायम आहे. आधुनिक युग असले तरी त्याचे अजूनही अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण देवदेवता मानतो त्याचप्रमाणे बाया म्हणजेच देवीचे रूप असे मानले जाते. प्रत्येक विभागात त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने सन्मान केला जातो. यामध्ये बायांच्या गाण्याचे महत्त्व अधिक आहे. पाणी घालणे ही त्यातील एक पद्धत आहे. शक्यतो लहान मुलामुलींना बाया येतात आणि त्या वेळी त्यांचे जवळपास सर्वच हट्ट पूर्ण केले जातात. बाया आल्यानंतर साधारणतः आठ दिवसांनी पाणी घालणे कार्यक्रम केला जातो आणि यामध्ये प्रामुख्याने बायांची गाणी गायली जातात, पण सध्याच्या काळात ही गाणी गाणारी लोक हाताच्या बोटावर मोजण्याएवढी राहिली आहेत. विशेषतः ही वयस्कर मंडळी असायची. यामध्ये युवक चुकूनही दिसायचे नाहीत, मात्र पोयंजे येथील कै. सदाशिव मते यांच्या आशीर्वादाने व 55 वर्षीय पांडुरंग म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश मते, अमित पवार, योगेश भोईर, भावेश मते, रोशन पोपेटा, प्रदीप ठाकूर ही तरुण मंडळी गेल्या सहा वर्षांपासून बायांची गाणी गाऊन सेवा करीत सर्व भक्तगणांना मंत्रमुग्ध करीत आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास पाणी घालणे सोहळ्याला परिपूर्ण करीत आहेत. या सोहळ्याला साजणारी गाणी वाजवणे आणि साथ अत्यंत प्रभावीपणे देत असल्याने त्यांना भरभरून दाद मिळत असते. काही जण देवी येणे किंवा त्याला सन्मान देण्याला अंधश्रद्धा मानत असले तरी मानला तर दगड पण देव नाही तर दगडच. त्यामुळे श्रद्धा किंवा अंधश्रद्धा हा भाग वेगळा, पण परंपरा किंवा श्रद्धा म्हणून जपलेली ही रूढी कौटुंबिक सोहळा मानायला काहीच हरकत नाही.
दमदार आवाज आणि दमदार वाजवणी या बायांच्या गाण्याला चार चांद लावतात आणि तेच करून नेमके हे तरुण मने जिंकतात, तसेच युवकांच्या या कलेला ऐकताना बायांच्या गायनात मुरलेले कलाकार असल्याची झलक मिळते. त्यामुळे संपूर्ण वातावरण उत्साहित आणि प्रसन्न होते. त्यामुळे पनवेल, उरण, कर्जत, पेण, अलिबाग या ठिकाणीही हे तरुण आपली कला सादर करीत असतात आणि त्यांना यामध्ये खूप समाधान वाटते. त्यामुळे मोजक्याच शब्दांत सांगायचे तर ते कोणत्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता मनोभावे सेवा करतात.