माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश गावडे यांची चौकशीची मागणी

खालापूर : प्रतिनिधी
चौक ग्रामपंचायत विकासकामांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, त्याची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अन्यथा उपोषण किंवा आत्मदहन करण्याचा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश गावडे यांनी खालापूरच्या वरिष्ठ गटविकास अधिकार्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. एलईडी दिवे खरेदी प्रकरणातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणून चौक ग्रामपंचायत बरखास्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश गावडे आणि त्यांच्या पत्नी सुषमा गावडे यांनी आणखी एक भ्रष्टाचार प्रकरण उघडकीस आणले असून, या प्रकरणाच्या चौकशीची मागणी खालापूरच्या वरिष्ठ गटविकास अधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. एलईडी भ्रष्टाचार प्रकरणात कोकण आयुक्तांनी चौक ग्रामपंचायत बरखास्तीचे आदेश दिले होते, मात्र त्याला ग्रामविकास मंत्रालयाने स्थगिती दिली. त्यामुळे चौकचा कारभार पुन्हा लोकप्रतिनिधींच्या हाती आला आहे. त्यानंतर विकासकामांची बिले अदा करताना अनेक चुकीच्या नोंदी झाल्या असून, यात लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचे सुरेश गावडे यांचे म्हणणे आहे. 15 टक्के समाज कल्याण निधीमधून केलेली साहित्य खरेदी व विकासकामातदेखील गौडबंगाल असून याची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी गावडे यांनी केली आहे. चौक ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील जांभिवली गावातील रस्त्याचे काम न करताही दीड लाखाचा धनादेश काढण्यात आल्याचे कागदोपत्री पुरावे आपण गटविकास अधिकारी आणि ग्रामविकासमंत्री यांना दिले असल्याचे सुरेश गावडे यांनी सांगितले.