Breaking News

व्यापार्‍यांना लुटणार्‍या दोघा आरोपींना सहा वर्षे सक्तमजुरी

माणगाव सत्र न्यायालयाचा निर्णय

माणगाव, पाली : प्रतिनिधी

शस्त्राचा धाक दाखवून व्यापार्‍यांना लुटणार्‍या दोघा आरोपींना माणगाव येथील सत्रन्यायालयाने गुरुवारी (दि. 19) सहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

आरोपी हरिश्चंद्र गुडेकर याने सोन्याची देवाणघेवाण करण्याचा व्यवहार करण्यासाठी रमेश भिकमचंद परमार व इतर चार व्यापार्‍यांना 15 मार्च 2016 रोजी पाली (ता. सुधागड) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धोंडसे गावाजवळील दळवी फॉर्महाऊस येथे बोलावले होते. त्यानुसार रमेश परमार व इतर व्यापारी तेथे सोने खरेदीसाठी आले असता त्यांना विनोद विष्णू गुडेकर व इतर सहा आरोपींनी  मारहाण केली तसेच पिस्तुलचा धाक दाखवून त्यांचे हातपाय बांधून त्यांच्याकडील एक कोटी 14 लाख रुपये, सोन्याची चैन, घड्याळ व मोबाइल फोन व गाड्यांच्या चाव्या काढून घेतल्या. या व्यापार्‍यांना एक रूममध्ये बंद करून आरोपींनी पोबारा केला होता. या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात भादविसं कलम 395,397,120-ब सह भारतीय शस्त्र अधिनियम कलम 4,25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक व्हि. पवार यांनी या गुन्ह्याचा तपास करून  आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.

सदर खटल्याची सुनावणी माणगाव सत्रन्यायालयात  झाली. सदर खटल्यामध्ये सहाय्यक सरकारी वकील जितेंद्र म्हात्रे साक्षीदार तपासले व न्यायालयासमोर प्रभावीपणे युक्तिवाद केला. सत्र न्यायाधीश एन. एस. कोले यांनी आरोपी विनोद विष्णू गुडेकर व संतोष तुकाराम महाडीक यांस दोषी ठरवून सहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. उर्वरीत आरोपीना निर्दोष मुक्त केले.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply