

पेण ः प्रतिनिधी
प्रामाणिक भावनेतून केलेल्या कार्याला ईश्वराचीही साथ लाभते. असेच कार्य संस्कार विद्यालयाचे सर्व पदाधिकारी करताहेत, असे गौरवोद्गार नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी गडब येथील संस्कार विद्यालयाच्या वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी काढले. आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक शांताराम चवरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष संजय चवरकर, गडब सरपंच अपर्णा कोठेकर, वढाव सरपंच पूजा पाटील, माजी नगरसेविका ज्योती म्हात्रे, रमाकांत पाटील, तन्वी पाटील, उपाध्यक्षा चारुमती कोठेकर, माजी सरपंच विजय पाटील, उज्ज्वला पाटील, विजया पाटील, मुख्याध्यापक चिंतामणी मोकल आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी सांगितले की, एखादी संस्था काढणे जितके सोपे असते तितकेच ती चालविणेही कठीण असते. शैक्षणिक संस्था चालवताना अनेक अडीअडचणी येत असतात, परंतु गेली 20 वर्षे अशा अडीअडचणींना तोंड देत संस्थेचे पदाधिकारी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत. पूर्वी येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पेण येथे यावे लागत असल्याने पालक व विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात होता, तसेच आरोग्यावरही परिणाम होत असल्यामुळे शांताराम चवकर व त्यांच्या सहकार्यांनी ही संस्था उभारून एकप्रकारे शैक्षणिक कामात योगदान देण्याचे काम केले आहे. पहिली ते चौथी हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया आहे. हा पाया भक्कम करण्याचे काम शिक्षक करीत असतात, परंतु सर्वस्वी जबाबदारी शिक्षकांवर न सोडता पालकांनीही आपल्या पाल्याकडे जातीने लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. येथील शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन पाहता विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक दर्जा वाढविण्याबरोबरच त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याचे काम येथील शिक्षक करीत असल्याचे समजते, असे सांगून विद्यार्थ्यांनी आपल्याला आवडेल त्या क्षेत्रात प्रगती करून आपले व शाळेचे नाव मोठे करावे, असे प्रीतम पाटील यांनी सांगितले. या वेळी प्रस्ताविकपर भाषणात संस्थेचे अध्यक्ष संजय चवरकर यांनी संस्थेने गेल्या 20 वर्षांत कशा प्रकारे प्रगती केली याचा आढावा घेतला. अध्यक्षीय भाषणात शांताराम चवरकर यांनी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, पालकवर्ग व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने ही शाळा प्रगती करीत असून अनेक उपक्रमांत सर्व मान्यवरांचा हातभार लागत असल्याचे सांगितले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्रक व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन चिंतामणी तांबोळी यांनी केले.