Breaking News

कोट्यवधींच्या कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी शेकाप नेते विवेक पाटील याच्यावर गुन्हा दाखल

एकूण 76 जण आरोपी; अभिजित पाटील यांचाही समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्त
कर्नाळा नागरी सहकारी बँकेत केलेल्या 512.50 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी शेकापचे नेते, माजी आमदार तथा कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील आणि बँकेच्या संचालक मंडळातील 14 सदस्यांसह एकूण 76 जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींमध्ये विवेक पाटील यांचे पुत्र अभिजित पाटील यांचाही समावेश आहे. ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत न करता उलट उत्तरे देणार्‍या विवेक पाटलांना यानिमित्ताने जोरदार चपराक बसली असून, आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
बोगस कागदपत्रांच्या आधारे कर्नाळा बँकेतून सुमारे 512.50 कोटींचे कर्ज काढल्याप्रकरणी सहकार खात्याच्या निर्देशानुसार जिल्हा विशेष लेखा परीक्षक उमेश गोपीनाथ तुपे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एकूण 76 जणांवर सोमवारी (दि. 17) रात्री भादंवि कलम 409, 417, 420, 463, 465, 467, 468, 471, 477, 201, 120 (ब), 34सह सहकारी संस्था अधिनियम 1961चे कलम 147सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधांचे रक्षण अधिनियम 199चे कलम 3अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील, उपाध्यक्ष व संचालक मंडळ, तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बँकिंग नियमांचे उल्लंघन करून, आपापसात संगनमत करून गैरव्यवहार करण्याच्या हेतूने कागदपत्रांमध्ये फेरफार केला. कागदपत्रे नष्ट केली व बनावट कागदपत्रे तयार केली, तसेच त्याचा या कर्ज प्रकरणात वापर करून बँकेचे सभासद, ठेवीदार व शासनाची फसवणूक करून ठेवीदारांनी विश्वासाने ठेवलेल्या 512 कोटी 54 लाख 53 हजार 286 रुपयांचा अपहार केला आणि बँकेची आर्थिक स्थिती डबघाईस आणली. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सहकारी संस्थेने तक्रारीत म्हटले आहे. त्याचप्रमाणे सन 2008 ते आजपर्यंत विवेक पाटील यांनी बोगस कर्ज प्रकरणांतून 512 कोटी 54 लाख 53 हजार 286 रुपयांचा अपहार केल्याचे लेखा परीक्षणाच्या अहवालातून उघड झाले असून, हा मुद्देमाल अद्याप मिळाला नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून कर्नाळा बँकेच्या हजारो ठेवीदारांना व खातेदारांना पैसे मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार आश्वासने देऊनही ठेवीदारांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळत नाहीत. याशिवाय बोगस कागदपत्रांच्या आधारे जवळपास 512.50 कोटींचे कर्ज काढल्याचा ठपका सहकार खात्याने कर्नाळा बँकेवर ठेवला आहे. ठेवीदारांचे पैसे देण्यास विवेक पाटील वारंवार टाळाटाळ करण्याबरोबरच मग्रुरीने उत्तरे देत होते. ठेवीदार आणि खातेदारांच्या सहनशीलतेचा अंत झाल्याने या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी या लोकांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्याकडे धाव घेतली. त्या अनुषंगाने न्याय मिळवून देण्याच्या प्रामाणिक भूमिकेतून प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही लोकप्रतिनिधींनी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून सहकार खाते व आरबीआय यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.
सहकार खात्याबरोबर पाठपुरावा करीत असताना मागील महिन्यात आरबीआयच्या मुंबई येथील कार्यालयावर, तसेच काही दिवसांपूर्वी पनवेलमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्याची दखल घेत सहकार खात्याच्या तक्रारीवरून कर्नाळा बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार विवेक पाटील आणि बँकेच्या 14 संचालकांसह एकूण 76 जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक (प्रशासन) शत्रुघ्न माळी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या 76 जणांची नावे
1) विवेकानंद शंकर पाटील, 2) सुभाष मधुकर देशपांडे, 3) भालचंद्र रामभाऊ तांबोळी, 4) मच्छिंद्र कृष्णा नाईक, 5) विष्णू चिंतु म्हात्रे, 6) डॉ. अरिफ युसुफ दाखवे, 7) रामचंद्र धोंडू पाटील, 8) अभिजित विवेकानंद पाटील, 9) धर्मराज उंदू नाईक, 10) रवींद्र श्रावण चोरघे, 11) सदाशिव महादू वाघ, 12) पूनम प्रकाश वाजेकर, 13) शालिनी शंकर ठाणगे, 14) ज्योती नंदू कापसे, 15) हेमंत मुरलीधर सुताने, 16) मारुती बुधाजी भोपी, 17) प्रमोद बुधाजी भगत, 18) सुरेश आत्माराम ठाकूर, 19) यशवंत काशिनाथ म्हात्रे, 20) भगोरथ पांडुरंग चोरघे, 21) दीपक नरहरी पाटील, 22) राजेंद्र आर. सिंग, 23) गणेश सोमा सावंत, 24) भालचंद्र कचेर पाटील, 25) अतुल लक्ष्मण शेडगे, 26) प्रभाकर मधुकर पाटील, 27) विलास नारायण फडके, 28) गणेश परशुराम गायकर, 29) सुलतान कुरेश सिद्धीकी, 30) सुजित राजाराम म्हात्रे, 31) महादेव वामन बंडा, 32) अनंता धर्माजी कडू, 33) एकनाथ लहू माळी, 34) अशोक खंडू म्हात्रे, 35) शेखर हरिश्चंद्र कानडे, 36) राजेंद्र कृष्णा पाटील, 37) प्रकाश हरिभाऊ पाटील, 38) दामाजी चांगा शिवकर, 39) विशाल विनायक गावंड, 40) पांडुरंग जयराम तांडेल, 41) गणेश शंकर खुटले, 42) जीवन पांडुरंग गावंड, 43) संतोष हरिभाऊ पाटील, 44) सुरेश गजानन पाटील, 45) शशिकांत सावळाराम पाटील, 46) राजेश पांडुरंग हातमोडे, 47) संदीप भरत पाटील, 48) अशोक गणू गायकर, 49) सुजित लक्ष्मण शेडगे, 50) विशाल विनायक गावंड, 51) सौरभ सुरेश पाटील, 52) विलास दत्तात्रेय गवंडी, 53) ज्ञानेश्वर रामा कोंडीलकर, 54) कृष्णा हिरा पाटील, 55) नरेश किशोर गावंड, 56) प्रशांत मारोती शितकणगे, 57) नीलम दत्तात्रय कडू, 58) रवींद्र शांताराम घरत, 59) सीताराम जनार्दन नाखवा, 60) राम गणपत भोईर, 61) रमाकांत काशिनाथ पाटील, 62) अनंता शंकर पवार, 63) रमेश सीताराम मोरे, 64) प्रमोद मायाजी पाटील, 65) अब्दुला अशफाक पिट्टू, 66) पुंडलिक परशुराम पाटील, 67) गजानन तुळशीराम पाटील, 68) योगेश काशिनाथ पाटील, 69) रवींद्र श्रावण चोरघे, 70) ज्ञानेश्वर हसुराम मोरे, 71) अनंत शंकर पवार, 72) गोपाळ रामा भगत, 73) सीताराम किसन पाटील, 74) मनोहर चांगू पाटील, 75) गौतम गिरीधर अगा, 76) कलावती जीवन गावंड
…तर अशी वेळ आली नसती!
विवेक पाटील यांनी ठेवीदारांना विश्वासात घेऊन त्यांचे पैसे वेळेवर देणे क्रमप्राप्त होते, मात्र त्यांनी तसे न करता आपल्या तोर्‍यात आणि उलटसुलट उत्तरे देत मनमानी केली. सर्वसामान्य ठेवीदारांचे पैसे स्वतःच्या स्वार्थापोटी कर्नाळा स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टद्वारे गिळंकृत न करता परत केले असते, तर आज विवेक पाटलांवर ही वेळ आली नसती, अशी चर्चा पनवेलमध्ये आहे.
आता शेकापची भूमिका काय?
माजी आमदार विवेक पाटील शेकापचे नेते आहेत. तब्बल 512 कोटी रुपयांचा घोटाळा करून पक्षाची रायगडसह महाराष्ट्रात बदनामी करण्याचे काम त्यांनी केले आहे. पूर्वी मोर्चा काढणारा आक्रमक पक्ष म्हणून शेकाप ओळखला जात असे, पण आता या घोटाळ्याच्या निमित्ताने विवेक पाटील यांची पक्षातून हाकालपट्टी होणार का? किंवा याबद्दल शेकापची काय भूमिका असणार, याकडे रायगडसह राज्याचे लक्ष लागले आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply