Breaking News

अपघातग्रस्तांसाठी ‘मृत्यूंजयदूत’

 महामार्गावर 1 मार्चपासून राबविली जाणार योजना

पनवेल : वार्ताहर

महामार्गावरील वाहनांचे वाढते प्रमाण पाहता घडणार्‍या अपघात व वाढणारे मृत्यूचे प्रमाण ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. हे प्रमाण कमी करण्याकरिता 1 मार्च 2021 रोजीपासून महामार्गाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून हायवे मृत्यूंजयदूत योजना राज्यात राबविण्यात येणार आहे.

भारतामध्ये दरवर्षी रस्ते अपघातात अंदाजे दीड लाख लोकांचा मृत्यू होतो असे रस्ते अपघाताचे विश्लेषणात दिसुन आले आहे. अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना उपचाराकरीता योग्य वेळी रुग्णालयात नेले जात नाही किंवा अपघातग्रस्तांना रूग्णालयात नेतांना व्यवस्थित न हाताळल्याने जखमी व्यक्तीच्या शरिरास अधिक इजा होते व काही वेळा मृत्यू होतो. त्यामुळेही मृत्यूचे प्रमाण वाढते. याकरीता गोल्डन अवर मध्ये अपघातग्रस्तांना व्यवस्थितरित्या रुग्णालयात नेता यावे व त्यांना योग्य उपचार त्वरीत मिळण्यासाठी राज्य महामार्ग पोलीस विभागातर्फे हायवे मृत्यूंजय दूत ही योजना राज्यातील महामार्गावर राबविण्यात येणार असून या योजनेची रुपरेषा खालीलप्रमाणे आहे.

महामार्ग अखत्यारीतील महत्त्वाचे राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील सर्व मॉल, पेट्रोल पंप, ढाबा किंवा हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी तसेच महामार्गाचे लगतच्या गावातील चार ते पाच लोकांचा ग्रुप तयार करून त्यांना मृत्यूंजय देवदूत नावाने संबोधण्यात येणार आहे. या देवदूत व्यक्तींना अपघातग्रस्त व्यक्तिस कसे हाताळावे किंवा कसे उचलावे याबाबतचे प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देऊन त्याच्या प्रत्येक ग्रुपला एक स्ट्रेचर व प्राथमिक उपचाराचे साहित्य देण्यात येणार आहे. महामार्ग अखत्यारीतील राष्ट्रीय व राज्य महामार्गानजिकच्या हॉस्पिटलची नावे पत्ते व संपर्क क्रमांक अदयावत करण्यात येणार आहेत. अ‍ॅम्बुलन्ससाठी 108 हा दुरध्वनी क्रमांक आहे. याबाबत माहीती देवदूत यांना देवून इतर खासगी व इतर रुग्णालयास संलग्न असणार्‍या अ‍ॅम्बुलन्सची माहिती सुध्दा देण्यात येणार आहे.

हायवे मृत्यूंजय दूत यांना अपघातप्रसंगी मदत करताना कोणतीही अडचण येवू नये करीता त्यांना महामार्ग सुरक्षा पथकांकडून ओळखपत्र देण्यात येणार आहेत. देवदूतांना प्रोत्साहन मिळावे करीता देवदूतांना प्रशिस्तपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांनी जाहीर केलेली स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना या योजनेची सविस्तर माहिती संबंधीत नातेवाइक आणि संबंधीतांना देण्यात येणार आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply