Breaking News

वृक्षो रक्षति रक्षित:

पर्यावरणातील सर्वात प्रमुख घटक म्हणजे झाडे. झाडांच्या विपुलतेवर पर्यावरणाचा समतोल राखला जातो. पर्यावरणाच्या संतुलनासाठी निसर्गातील सर्व सजीव आपापल्यापरीने सृष्टीला अन्नाच्या बदल्यात काही ना काही परत करत असतात. ज्यामुळे निसर्गचक्र सुरळीत चालण्यासाठी मदत होते. केवळ माणूस हा एकमेव असा प्राणी आहे जो निसर्गाकडून सतत खूप काही ओरबाडून घेण्यातच दंग आहे. आणि निसर्गाला परत देण्यासाठी मात्र तो कृतघ्न असतो. माणसाने सतत निसर्गाची हानी करण्याचा चंग बांधला आहे.

सुरुवातीच्या काळात माणूस इतर पशुपक्षांप्रमाणे निसर्गाशी नाळ जुळवून होता. पण हळूहळू बुद्धीचातुर्याच्या जोरावर त्याने इतरांपेक्षा आपले  वेगळे स्थान निर्माण केले. आधुनिक जगात तर माणसाने निसर्गाला अनेक आव्हाने दिली. विघातक कृत्यांच्या माध्यमातून निसर्गाला हानी पोचवण्यात आपला मोठेपणा मानला. विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली गेली. कारखान्यांसाठी, शेतीसाठी, रस्त्यांसाठी अक्षरश: जंगले साफ केली गेली. याचा परिणाम आपल्या वातावरणातील बदलांमधून आपणांस दिसतच आहे. माणसाने या ना त्या कारणाने मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली आणि त्याचे दुष्परिणाम आता आपण भोगायला सुरुवात झाली आहे.

जंगले नष्ट झाल्यामुळे वन्यजीव धोक्यात आले. याचा विपरीत परिणाम असा झाला की, मानवी वस्तीकडे वन्यजीवांनी आपला मोर्चा वळवला व एकंदरीत मानवी जीवनच धोक्यात आले. वन्य प्राण्यांमध्ये माकडांसारखे प्राणी शेतकर्‍यांच्या शेतात येऊन पिकांचे नुकसान करताना दिसत आहेत. शेतकरी या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात  असफल झाले. व शेतकर्‍यांनी विविध फळांची व उपयोगी झाडे तोडायला सुरुवात केली. यामुळे मोठ्या प्रमाणात जंगलाचा र्‍हास होताना दिसून येत आहे. लाकूड तोडणार्‍या मजुरांकडे अत्याधुनिक यांत्रिक कटर आल्याने या कामात मोठ्या प्रमाणात वने नष्ट होताना आढळून येतात. शासनाने कुर्‍हाडबंदी केली पण कटरबंदी कधी होणार?

विविध सोयी-सुविधांच्या नावावर पर्यावरणाचे संतुलन बिघडवण्यास मानवी कृती कारणीभूत आहेत. याचा परिणाम निसर्ग चक्रावर होऊन पावसाचे प्रमाण अनिश्चित झाले आहे, नद्या आटत आहेत, पाण्याची भूगर्भातील पातळी पाचशे ते हजार फुटापर्यंत खालावलेली आहे, ऋतुमानानुसार हवेतील बदल प्रकर्षाने जाणवत आहेत. मागील काही वर्षापासून हवेतील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिल्लीसारख्या शहरात हवेच्या प्रदूषणाने अनेक लोक श्वसनाच्या आजारांना बळी पडले आहेत. विविध भौतिक सोयी-सुविधांच्या वाढत्या वापरामुळे, वाहनांच्या गर्दीमुळे, रासायनिक कारखान्यामुळे हवेत मोठ्या प्रमाणात विषारी वायू वाढत आहे. आणि त्याला नियंत्रणात ठेवणारा निसर्गातील एकमेव घटक झाडे मात्र मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. याचे परिणाम खूपच भयंकर होणार हे निश्चित.

कोरोनासारखे श्वसनाशी संबंधित आजार आपले डोके वर काढत आहेत. नुकत्याच आलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. प्राणवायु विना अनेक जीव गेले. अनेक ठिकाणी ऑक्सीजन निर्मितीचे प्रकल्प उभारावे लागले. याचे स्पष्ट कारण हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण खालावलेले आहे. अशी स्थिती जर पुढेही राहिली तर प्रत्येकाला ऑक्सीजन सिलेंडर पाठीवर घेऊन फिरावे लागेल. त्यामुळे सर्वांनी वेळीच सावध होण्याची नितांत गरज आहे.

आज आपण जो प्राणवायू घेत आहोत, तो आपल्या पूर्वजांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे म्हणजे त्यांनी निसर्गाशी जुळवून घेऊन मोठ्या प्रमाणात फळा-फुलांची झाडे मोठमोठी झाडे घर, अंगण, शेत, परस बाग, पडीत जमिनीवर, रस्त्यांच्या दुतर्फा, मंदिरांसभोवती मोठ्या प्रमाणात प्राणवायू देणारी झाडे लावली यामध्ये वड, पिंपळ, आंबा, कडूनिंब या झाडांची लागवड केली होती. त्यांच्या माघारी आपण त्यांनी लावलेली झाडे तोडण्यावर भर देत आहोत, हे कुठेतरी थांबले पाहिजे.

सर्व संत महात्म्यांनी झाडांचे आपल्या जीवनातील महत्त्व वेगवेगळ्या अभंगातून स्पष्ट केले आहे. छत्रपती शिवरायांनीसुद्धा वृक्षांचे महत्त्व जाणून अनेक अध्यादेश काढले होते. पृथ्वीवर माणसांप्रमाणे सर्व सजीवांना राहण्याचा, वाढण्याचा, नवनिर्माणाचा अधिकार सृष्टीने दिलेला आहे. त्यावर माणूस कुरघोडी करू पाहत आहे आणि त्याचे विपरीत परिणाम दिसत आहेत.

वृक्ष लागवडीची व संवर्धनाची जबाबदारी केवळ सरकारवर सोडून चालणार नाही. आपल्याला आपल्या परीने वृक्ष लागवड व संवर्धन यासाठी काही करता येईल का? याचा विचार केला पाहिजे. आपण आपल्या घरासमोर, शेताच्या बांधावर नव्याने झाडे लावून त्यांचे संवर्धन करू शकतो. आजचे बालक उद्याचे भावी नागरिक आहेत. तेव्हा बालवयातच शालेय जीवनात मुलांना वृक्ष लागवडीचे व संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. मुलांच्या माध्यमातून विविध वनस्पतींच्या बियांचा संग्रह करून छोटेखानी रोपवाटिका तयार करता येऊ शकते. त्या रोपांची चांगली वाढ झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात त्याची लागवड करू शकतो. वृक्ष लागवड व संवर्धन ही लोक चळवळ झाली पाहिजे. या पृथ्वीवर जगणार्‍या प्रत्येक माणसाने स्वतःच्या व आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन केले पाहिजे. शेतकर्‍यांना विविध प्रकारच्या वृक्ष लागवडीसाठी चालना दिली पाहिजे. चंदन,आंबा, चिकू, संत्री, मोसंबी, सागवान, लिंबू, चिंच, आवळा, सीताफळ, बोर यासारख्या फळझाडांची फळबाग शेतकर्‍यांनी लावावी यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध होणे आवश्यक आहे. आपले भविष्य आरोग्यदायी व सुखी राहावे असे जर आपणांस वाटत असेल तर, आत्ताच वृक्ष लागवडी च्या व संवर्धनाच्या मोहिमेत सामील व्हा. विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून हे काम हाती घ्या. आपला आठवड्यातील किमान एक तास तरी निसर्गासाठी द्या. तरच आपले भविष्य आरोग्यदायी असेल.

चला जोडुया निसर्गाशी नाळ, निसर्ग करेल आपला सांभाळ

-जगदिश सु. जाधव, प्राथमिक शिक्षक, पुसद

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply