नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्याचे समजते. त्यामुळे केंद्र सरकारने काश्मीर खोर्यात लष्करी जवानांच्या 100 तुकड्या तैनात केल्या आहेत. दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत असले तरी सरकारकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. दरम्यान, रविवारी (दि. 28) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि काश्मिरातील सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकार्यांची बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवादी काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांनी ही बैठक घेतली आहे. सुरक्षा दलाच्या जवानांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. केंद्र सरकार काश्मीरमधील कलम 35 ए हटवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सुरक्षा दलाचे जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने कलम 35 ए हटवण्याची तयारी केली असून, त्याला विरोध होत आहे. राज्यात हिंसाचार किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून केंद्र सरकारने अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.