आपल्या देशात सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येक जण आपले मत निसंकोचपणे व न घाबरता व्यक्त करू शकतो, पण म्हणून तोंडाला येईल ते बरळायचे नसते. राजकारणी मंडळींनी तर हरएक शब्द तोलूनमापून बोलणे आवश्यक असते, मात्र एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी चिथावणीखोर विधान करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संताप व्यक्त होणे स्वाभाविकच आहे.
केंद्र सरकारने गत डिसेंबरमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) संसदेत पारित केला आणि राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर तो देशभर लागू झाला. या कायद्याला विरोधी पक्ष, तसेच काही संघटना विरोध दर्शवून जनतेची दिशाभूल करीत आहेत. वास्तविक सीएए हा नागरिकत्व हिरावून घेणारा नाही, तर नागरिकत्व देणारा कायदा आहे. या कायद्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशांतील अल्पसंख्याक म्हणजे हिंदू, जैन, बौद्ध, शीख, खिश्चन व पारसी समुदायातील जे लोक धार्मिक छळामुळे 31 डिसेंबर 2014पूर्वी भारतात आले आणि या देशात राहत आहेत त्यांना भारताचे नागरिकत्व मिळण्यासाठी आणखी सहा वर्षे न थांबता ते लगेच मिळणार आहे. भारतात राहणार्या कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकाशी त्याचा संबंध नाही. त्यामुळे देशवासीयांचे काडीमात्र नुकसान होणार नाही. असे असताना विरोधक तसेच देशविघातक व्यक्ती, संघटना हेतुपुरस्सर या कायद्याबाबत समाजात संभ्रम निर्माण करून त्याद्वारे देशात अस्थिरता माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएम ही त्यातलीच एक असंतुष्ट पक्ष संघटना.
‘सीएए’च्या विरोधात कर्नाटकातील गुलबर्गा येथील सभेत बोलताना एमआयएमचे नेते व माजी आमदार वारिस पठाण यांनी ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लिम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. आपणही सोबत आलो, तर काय होईल? आपण 15 कोटी असून, 100 कोटींना भारी पडू,’ असे चिथावणीखोर विधान केले होते. 15 फेबु्रवारीला झालेल्या या जाहीर सभेचा व्हिडीओ समोर आला असून, वादग्रस्त वक्तव्यावर सर्वत्र टीका होत आहे. ‘सीएए’च्या विरोधात मुस्लिम महिला नवी दिल्लीतील शाहीन बाग येथे गेले दोन महिने आंदोलन करीत आहेत. त्याचा संदर्भ देत पठाण यांनी केलेल्या विधानावरून दिल्लीसह संपूर्ण देशभरातील वातावरण तापले आहे.
सर्वोच्च न्यायालय राजधानीतील आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत असताना पठाण यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. यापूर्वीही त्यांनी वादग्रस्त विधाने केली आहेत. पठाण हे 2014मध्ये मुंबईतील भायखळा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. मागील निवडणुकीत ते पराभूत झाले. आता ते पक्षाचे प्रवक्ते आहेत. सध्या त्यांना कुणीही विचारत नसल्याने जहाल वक्तव्य करून आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा त्यांचा हा खटाटोप दिसतोय, मात्र ते करताना त्यांचे भान सुटले. एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पठाण यांना माध्यमांशी बोलण्यास बंदी घातली आहे, तर औरंगाबादचे खासदार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पठाण यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण मागणार असल्याचे म्हटले आहे. एकाने बोलायचे आणि दुसर्याने सावरून घ्यायचे अशीच यांची आजवरची नीती राहिली आहे.
दस्तुरखुद्द एमआयएमचे प्रमुख नेते असदुद्दीन व अकबरुद्दीन ओवेसी बंधू प्रक्षोभक विधानांसाठी कुख्यात आहेत. अकबरुद्दीन ओवेसी यांनी 2013मध्ये एका वादग्रस्त भाषणात ‘जर सरकारमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी केवळ 15 मिनिटे पोलिसांना बाजूला करावे. मग पाहा काय होते. देशात 25 कोटी मुस्लिम आहेत आणि 100 कोटी हिंदू. जर 15 मिनिटांसाठी पोलिसांना हटवले, तर कळेल कोणामध्ये किती ताकद आहे ते,’ अशी गरळ ओकली होती. पठाण असो, ओवेसी किंवा एमआयएमचे अन्य नेते; आपण मुस्लिमांचे मसिहा आहोत असे भासवून त्यांची एकगठ्ठा मते मिळविण्यासाठी ही मंडळी अधूनमधून बेताल विधाने करीत असतात. पठाण यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यावरून त्यांना पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी माध्यमांशी बोलण्यास बंदी घातली आहे, मात्र हेच ओवेसी जाहीर सभेवेळी व्यासपीठावर होते, असे सांगण्यात येत आहे. असे असेल तर तेव्हा का नाही त्यांनी पठाण यांना फटकारले किंवा त्यांनी केलेले विधान चुकीचे असल्याचे म्हटले. आता त्यांची बोलती बंद करून काय साध्य होणार? जे बोलायचे ते तर पठाण बोलून गेलेत. हे म्हणजे मी मारल्यासारखे आणि तू रडल्यासारखे कर असेच आहे.
अल्पसंख्याक म्हणून गळे काढणार्या एमआयएमवाल्यांनी मुस्लिम समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी किती प्रयत्न केले हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. मुस्लिम समाजात आजही शिक्षणाचा अभाव आहे. या समाजातील अनेक स्त्रिया गुलामगिरीचे जिणे जगत आहेत. त्यांचे जीवन सुखी करण्यासाठी का बरे एमआयएमने कधी पुढाकार घेतला नाही. तिहेरी तलाकविरोधी कायदा करण्यासाठी पंतप्रधान मोदींनाच पुढे यावे लागले. मग केवळ हिंदूंविषयी द्वेष, विखार पसरवून मुस्लिम लोकांना खूश करण्याचा हीन प्रयत्न एमआयएमचे नेते करीत असतील, तर सच्चा मुसलमानाला ते कदापि आवडणार नाही. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी तर 15 कोटी मुस्लिमांचा ठेका तुम्हाला कुणी दिला, अशा शब्दांत पठाण यांचे कान उपटले आहेत. अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. खरंतर आपला भारत देश विविधतेतील एकतेसाठी ओळखला जातो. इथे केवळ हिंदू, मुस्लिमच नव्हे; तर शीख, खिश्चन, जैन, बौद्ध, पारसी यांसारख्या विविध समाजांतील लोकही गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. त्यालाच अनुसरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘सब का साथ, सब का विकास व आता सब का विश्वास’ असा नारा दिला आहे. सलग दुसर्यांदा केंद्रातील सत्तेवर आलेले मोदी लोकाभिमुख कारभार करीत असून, धडक निर्णय घेत आहेत. हीच विरोधकांची पोटदुखी आहे. त्यांनी विरोध जरूर दर्शवावा, पण देशाच्या एकता व अखंडतेला धोका पोहचविण्याचा प्रयत्न केल्यास खबरदार! जनताच तुम्हाला तुमची जागा दाखवेल!!
-समाधान पाटील, अधोरेखित