Breaking News

गुटख्याची खुलेआम विक्री

राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली आहे, मात्र तरीदेखील गुटखा सर्रास विक्री केला जात आहे. नेरळ बाजारपेठ आणि परिसरात गुटख्याची पान टपर्‍यांवर सर्रास विक्री होत आहे. काही दिवसांपूर्वी नेरळ पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी पकडलेला गुटख्याचा साठा मातीत गाडला असतानादेखील नेरळ परिसरात गोडाऊन उघडून त्यात साठा करून गुटख्याची नेरळ आणि परिसरात खुलेआम विक्री सुरू आहे.

नेरळ हे माथेरानचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जात असून या रेल्वेस्थानकातून माथेरानला जाण्यासाठी मिनीट्रेन सोडली जाते. अशा जंक्शन रेल्वेस्थानकाच्या बाहेर पडल्यावर महाराष्ट्र राज्यात बंद असलेला गुटखा तत्काळ उपलब्ध होतो. नेरळ स्टेशनच्या बाहेर एका गल्लीत गुटखा पोहच करणारे दुकान असून त्या होलसेल दुकानदाराचे नेरळ गावाच्या बाहेर मोठे गोडाऊन आहे. तेथून सर्व भागात

गुटखा पोहचवला जात असतो. नेरळ स्टेशनसमोरील गल्लीत शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची ऑर्डर दिली की तत्काळ तासाभरात गुटखा पोहचतो. त्याच वेळी नेरळ बाजारपेठ भागातील अनेक ठिकाणी गुटखा विक्रेते असून त्यातील अनेक व्यापारी हे गुटख्याची पाकिटे खिशात ठेवूनदेखील फिरतात. ज्या वेळी गिर्‍हाईक गुटख्याची मागणी करेल तेव्हा जादा भाव आकारून गुटख्याची पाकिटे दिली जातात. नेरळ बाजारपेठेमध्ये गुटखा होलसेलमध्ये मिळण्याची अनेक ठिकाणे असून सर्रासपणे गुटख्याची विक्री केली जात असताना नेरळ पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नाही.

दुसरीकडे नेरळ गाव आणि परिसरात असलेल्या दुकानदारांना होलसेलमध्ये शासनाने बंदी घातलेला गुटखा विक्री करणारा एकच विक्रेता असून त्याच्याकडून कळंबपासून कशेळे आणि खांडस या भागात जाऊन गुटखा पोहच केला जातो. त्यासाठी या गुटखा विक्रेत्याने आपले साठवण गोडाऊन नेरळ गावाबाहेर कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत उभारले आहे. या गुटखा विक्रेत्यांना शासनाने बंदी आणलेला तंबाखू सुपारीमिश्रित गुटखा विक्री करताना कोणीही अडवताना दिसत नाही. कारण त्या गुटखा विक्री करणार्‍या होलसेल व्यापार्‍यांना ना पोलिसांचे भय ना अन्न औषध प्रशासनाची चिंता. त्यात अन्न आणि औषध प्रशासन हे नेरळमधील या खुलेआम गुटखा विक्रीवर निर्बंध आणून कोणालाही अटक करीत नसल्याने या व्यवसायाला मोठी भरभराट आलेली दिसून येत आहे.

दोन वर्षांपूर्वी नेरळ पोलिसांनी ठाणे   जिल्ह्यातील वांगणीजवळ धाड टाकून गुटख्याचा किमान 10 लाख रुपयांचा साठा जप्त केला होता. नेरळ पोलिसांनी कारवाई करून गुटख्याची दोन ट्रक पाकिटे आणि मशिनरी जप्त करून नेरळ पोलीस ठाण्यात आणली होती. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने नेरळ येथे येऊन पुढील कार्यवाही केली होती. त्या वेळी जप्त करण्यात आलेला 10 लाख रुपयांचा गुटखा नेरळ पोलिसांनी मागील आठवड्यात जमिनीत गाडून नष्ट केला होता. त्यासाठी दुमजली घराएवढे दोन खड्डे खोदून त्यात ती गटख्याची पाकिटे टाकली होती आणि त्यानंतर त्या खड्ड्यात पुन्हा माती घालून खड्डे भरले होते. हे उदाहरण ताजे असतानादेखील नेरळ भागात सर्रास शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची विक्री होत असून नेरळ पोलीस किंवा अन्न औषध प्रशासन यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.

गुटखाबंदीनंतरही त्याची विक्री होत असेल, तर कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाला आहेत. त्यांनी धाड टाकण्यासाठी आमच्याकडे बंदोबस्त मागितला, तर आम्ही तत्काळ देत असतो. त्यांच्या विभागाला अधिकार असल्याने आम्हाला काहीही करता येत नाही, पण कोणी तक्रारी केल्यास आम्ही त्या विभागाला कळवून धाड टाकायला सांगू शकतो, अशी माहिती पोलीस अधिकारी अविनाश पाटील यांनी दिली आहे.

-संतोष पेरणे

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply