जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे प्रथम नागरिक अर्थात राष्ट्रपती असलेले डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्यावर येत आहेत. तसे पाहिले तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. मागील वर्षी ट्रम्प यांनी ‘हाऊ डी मोदी’ कार्यक्रम आयोजित करून मोदींचे स्वागत केले होते. आता मोदी ‘नमस्ते ट्रम्प’द्वारे त्याची परतफेड करीत आहेत. ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया हे 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद, आग्रा आणि नवी दिल्लीला भेट देणार आहेत. ट्रम्प यांच्या सन्मानार्थ ‘नमस्ते ट्रम्प’ हा विशेष कार्यक्रम अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा दौरा विविध विषयांनी गाजत आहे. बलाढ्य अशा अमेरिकेचे ते राष्ट्राध्यक्ष असल्याने त्यांच्या आगमनाविषयी चर्चा तर होणारच! भारतीय संस्कृती पाहुण्यांचा मान-सन्मान करणारी आहे. ‘अतिथी देवो भव’ म्हणून आपल्याकडे पाहुण्यांचे आदरातिथ्य केले जाते. आता ट्रम्प कुटुंबासह येणार म्हणजे त्यांची विशेष बडदास्त ठेवणे जरुरीचे आहे. त्या दृष्टीने जोरदार तयारी करण्यात आली आहे. हा दौरा आणि कार्यक्रमामागे पंतप्रधान मोदींचे देशाच्या विकास व प्रगतीच्या अनुषंगाने काहीतरी व्हिजन असणारच. तसेही मोदींनी धडाकेबाज निर्णय घेऊन व लोकाभिमुख कारभार करून देशाला नवा नावलौकिक मिळवून दिला आहे. पूर्वी जगभरातील देशांचा भारताकडे पाहण्याचा संकुचित दृष्टिकोन होता. भारत म्हणजे यथातथा देश असे मानले जायचे, पण मोदींनी भारत हा जागतिक स्तरावरील एक महत्त्वपूर्ण देश आहे आणि त्याला वगळून पुढे जाता येणार नाही, असा संदेश दिला. त्यांनी विविध देशांचे दौरे करून आपल्या देशाची महती आगळ्यावेगळ्या पद्धतीने सर्वत्र पोहचवली. त्याच वेळी विदेशी गुंतवणूक कशी वाढेल याबाबतही प्रयत्न केले. ट्रम्प यांचा हा दौराही द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करून उभय देशांच्या आगामी वाटचालीसाठी उपयुक्त ठरणार आहेे. ट्रम्प हे मोदींबरोबर लोकशाही, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वातंत्र्याच्या मुद्यांबद्दलही बोलणार असल्याचे म्हटले जात आहे. या दौर्यात व्यापार व संरक्षणविषयक धोरणांना चालना दिली जाणार आहे. भारतासाठी अमेरिका हा मोठा गुंतवणूकदार व थेट परकीय गुंतवणुकीचा मुख्य स्रोत आहे. ते लक्षात घेता स्थगित झालेला व्यापारविषयक संवाद पुन्हा सुरू झाल्यास भारतीय अर्थव्यवस्थेसाठी तो मैलाचा दगड ठरेल. म्हणून ट्रम्प यांच्या स्वागतासाठी सरकार कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. विशेष म्हणजे सुरक्षाव्यवस्था अतिशय चोख असणार आहे. स्वत: ट्रम्प यांनी अमेरिकेतून विविध पथके बोलावून सुरक्षेची चाचपणी केली आहे. ट्रम्प यांचा हा दौरा अविस्मरणीय व्हावा यासाठी सरकार हरतर्हेचे प्रयत्न करतेय. या दौर्याबाबत स्वतः ट्रम्पही फारच उत्सुक आहेत. फेसबुकवर डोनाल्ड ट्रम्प नंबर वन असल्याची पोस्ट पडताच ट्रम्प यांनी लगेच दुसरी पोस्ट टाकली आहे. फेसबुकवर मी नंबर 1 असेन, तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नंबर 2 वर आहेत. मी आता दोन आठवड्यांच्या भारत दौर्यावर जात आहे. या भारत दौर्याबाबत मी फारच उत्सुक आहे, अशी पोस्ट ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये पत्रकारांसोबत बोलताना म्हटलंय की, ते भारत दौर्याची तयारी करीत आहेत, जेथे लाखो लोक त्यांच्या स्वागतासाठी तयार आहेत. एकूणच या दौर्यातून भारत आणि अमेरिका या देशांमध्ये नवा अध्याय रचला जाण्याची चिन्हे आहेत.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …