Breaking News

बंदरांच्या विकासामुळे पर्यटकसंख्येत वृद्धी

कोकणाला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असून नारळ-सुपारीच्या वृक्षांमुळे व समुद्राच्या अस्तित्वामुळे कोकणाला पर्यटकांच्या आगमनामुळे मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. रायगड जिल्ह्याला 320 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असून अलिबाग-मुंबई येथे जलद बोटसेवा त्याचप्रमाणे आगामी काळात रो रो सेवा उपलब्ध झाल्याने या भागाचा जलद गतीने विकास होताना दिसत आहे. केंद्र शासनाच्या सागरमाला प्रकल्पामुळे कोकणातील बंदर विकासासाठी निधी प्राप्त झाल्याने बंदर विकासाचे काम जलदगतीने संपन्न होताना दिसत आहे.

प्रवासी वाहतूक करण्यासाठी नवीन जेट्टी, सभोवतालचा परिसर या विकासावर भर दिल्याने सर्वांत शेवटचे टोक म्हणून गणले जाणारे कोकण आता मुंबईपासून जवळ वाटू लागले आहे.

समुद्रमार्गे जलद सेवा मिळाल्यामुळे रस्त्यावरील प्रवास हा काही तासांचा असताना जलमार्गामुळे हा प्रवास काही मिनिटांतच होत असल्याने मुंबई येथील पर्यटक रो रो सेवा अथवा जलद बोटीच्या साह्याने कोकणात पोहचून वास्तव्य करून कोकणातील लोकांना मोठा स्वयंरोजगार प्राप्त होऊन गाव व शहरे स्वयंपूर्ण बनली. लोकांच्या हाताला काम व महिलावर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय जनता पार्टीच्या सरकारने सागरमालासारखी प्रभावी योजना आणल्यामुळे बंदरे विकसित होऊन लोकांना मोठा रोजगार व स्वयंनिर्भर बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.सागरमाला योजनेंतर्गत मुरूड तालुक्यातील आगरदांडा, खोरा, दिघी, राजपुरी, काशीद अशा बंदरांचा विकास होऊन जंगल जेट्टीमुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे अंतर काही तासांवर आल्याने बंदरांचा विकास किती महत्त्वाचा आहे हे यावरून दिसून येत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून खोरा बंदरातील वाहनतळाचे काम रखडले होते. खोरा बंदरातील संरक्षक भिंत व संपूर्ण परिसराला पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले होते, परंतु वाहनतळाचे काम प्रलंबित असल्याने सदरचे काम पूर्ण होणार की नाही अशी शंका घेण्यात येत होती, परंतु महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने या कामाकडे लक्ष दिले असून काही दिवसांपूर्वीच वाहनतळाच्या कामाला सुरुवात होऊन मोठ्या वेगाने हे काम पूर्ण होताना दिसत आहे. वाहनतळाच्या कामात खडी व दगडे टाकून ठेवण्यात आली होती, परंतु काँक्रीट करण्यात आले नव्हते. त्यामुळे पर्यटकांना आपली वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूस ठेवावी लागत होती. आता या वाहनतळाचे काम सुरू असून येत्या काही दिवसांतच हे काम पूर्ण होणार आहे. सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी खोरा बंदरातून हजारो पर्यटक येत असतात. सध्या तयार होत असलेल्या वाहनतळाची क्षमता दोनशे वाहन राहण्याजोगी असल्याने पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे. 190 मीटर लांबी व 22 मीटर रुंद असे अवाढव्य वाहनतळ निर्माण करण्यात आले आहे. उत्कृष्ट पद्धतीने सदरचे काम पूर्ण करण्यात येत असून येत्या काही दिवसांत क्युरिंग कालावधी पूर्ण होताच सदरचे वाहनतळ पर्यटकांच्या वाहनांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

खोरा बंदराचे बंदर निरीक्षक हितेंद्र बारापत्रे यांनी या वाहनतळाबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून सदरचे काम पूर्ण करण्यात येत असून सदरील तयार होणार्‍या वाहनतळामुळे किमान 200 वाहने पार्किंग करता येणार आहेत. वाहनतळाचे काम काही दिवसांतच पूर्ण होणार असून काम जलदगतीने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सदर वाहनतळामुळे पर्यटकांची वाहने आता नवीन वाहनतळावर पार्किंग होणार असल्याने रस्त्याच्या कडेला कोणतीही वाहने उभी राहणार नाहीत. मेरीटाइम बोर्डाकडून पर्यटकांना सुविधा प्राप्त होण्यासाठी सदरचे काम पूर्ण करण्यात आल्याचे या वेळी बारापत्रे यांनी सांगितले.

सागरमाला योजनेंर्गत मुरूड तालुक्यातील सर्वच बंदरांचा विकास झाल्याने शनिवार- रविवारचा योग्य साधत हजारो पर्यटक मुरूड येथील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला, पद्मदुर्ग किल्ला व अन्य पर्यटनस्थळांना भेट देऊन स्थानिक लोकांना रोजगार मिळत असल्याचे दिसत आहे.

-संजय करडे, खबरबात

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply