पनवेल ः रामप्रहर वृत्त
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 177व्या जयंतीनिमित्त रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने अचानक मित्र मंडळ शिरढोण आयोजित बहुचर्चित रायगड प्रीमियर लीगचा (आरपीएल) भव्यदिव्य लिलाव (ऑक्शन) सोहळा विसावा रिसॉर्टस् येथे झाला. या ऑक्शनसाठी रायगड जिल्ह्यातील तब्बल 2755 खेळाडूंनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी एकूण 446 खेळाडू लिलावात खरेदी केले गेले. रायगड जिल्ह्याच्या 12 तालुक्यांतील 32 संघ तसेच रायगड, पुणे, मुंबई ठाणे संघाचे कर्णधार व व्यवस्थापक यांनी ऑक्शनमध्ये सहभाग घेतला होता. या सोहळ्याचा शुभारंभ श्रीगणेशाच्या पूजनाने झाला. त्यानंतर आद्य क्रांतिवीरांच्या स्मरणार्थ क्रांतिज्योत व क्रीडाज्योत घेऊन वाजतगाजत मिरवणूक झाली. या ऑक्शनमध्ये प्रथम क्रमांकाचा चषक म्हणून हजारो वर्षांपूर्वी ज्याने यमुनेच्या तीरावर चेंडूफळी खेळून क्रिकेटचा अवघ्या पृथ्वीतलावर शुभारंभ केला त्या भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा असलेला चषक आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ प्रतिमा असलेला चषक यांचे अनावरण करण्यात आले. एकूण 32 संघांच्या कर्णधारांनी वेगवेगळ्या रंगांतील पोषख परिधान करून पोषाख अनावरण झाले. स्पर्धेतील मालिकावीरासाठी यामाहा कंपनीच्या दुचाकीचेसुद्धा अनावरण झाले. आरपीएलमध्ये विजेत्या एकूण 10 संघांना तब्बल 13 लाखांची रोख व वस्तू स्वरूपात पारितोषिके मिळणार आहेत. ऑक्शन सोहळा आरपीएलचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कार्याध्यक्ष महेश कडू, उपाध्यक्ष विशाल जितेकर व तेजस म्हात्रे यांचा नेतृत्वाखाली अचानक मित्र मंडळ, रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष राकेश गायकवाड, उपाध्यक्ष प्रशांत खानावकर, रायगड समालोचक अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष महेश म्हात्रे, पनवेल समालोचक अध्यक्ष मच्छिंद्र पाटील, उरण समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद भोईर, 24 लाईव्ह इव्हेंट्सचे संदेश पाटील, दिल्ली पब्लिक स्कूलचे मालक अनुज अगरवाल, आर्यन स्पोर्ट्सचे मालक समीर पाटील, ग्रामपंचायत सरपंच साधना कातकरी, उपसरपंच संगीता चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.