महाड : प्रतिनिधी
किल्ले रायगडसह महाड परिसरात गुरुवारी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल ताशे आणि डीजेच्या तालावर गुरुवारी पहाटेपासूनच तरुणांनी शिवजयंतीचा जल्लोष साजरा केला. किल्ले रायगडावरून आलेल्या शिवज्योतींचे महाडच्या छत्रपती शिवाजी चौकात स्वागत करण्यात आले. महाड शहरातील आदर्श नगर, नवेनगर, तांबटआळी, बाजारपेठ, चवदारतळे, काकरतळे आदी परिसरात ठिकठिकाणी विविध मंडळाकडून शिवजयंती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. किल्ले रायगडावरदेखील शिवप्रेमींनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. तेथील शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळापासून शिवज्योत प्रज्वलित करून आपआपल्या गावात नेण्यासाठी तरुणांनी गडावर गर्दी केली होती. महाड शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळानेदेखील शिवजयंतीचे आयोजन केले होते. या वेळी महाड शहरातून शिवप्रतिमेची भव्य मिरवणूकदेखील काढण्यात आली.
नेरळमध्ये शिवदौड ज्योतीचे स्वागत
कर्जत : बातमीदार
छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती गुरुवारी (दि. 12) नेरळमध्ये सार्वजनिक स्वरूपात करण्यात आली. येथील शिवदौड समितीच्या वतीने यावर्षी किल्ले सिंहगड येथून आणलेल्या शिवदौडीचे नेरळकरांनी जोरदार स्वागत केले. पुणे जिल्ह्यातील किल्ले सिंहगड येथून 145 किलोमीटर अंतर दोन दिवसात पार करून 27 तरुण गुरुवारी सकाळी दहा वाजता नेरळ गावात पोहोचले. त्यावेळी उत्सव समितीच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या शिवदौड ज्योतीचे स्वागत करण्यात आले. या वेळी उत्सव समितीचे अध्यक्ष दर्शन दीपक मोडक, उपाध्यक्ष कल्पेश देशमुख, ऋषिकेश पाटील, सचिव सूरज साळवी, सहसचिव प्रसाद शिंदे, पराग कराळे, खजिनदार अजिंक्य मनवे, सहखजिनदार उदय मोडक यांनी स्वागत केले. श्याम कडव आणि प्रथमेश कर्णिक यांनी सुरु केलेल्या या शिवदौडीमध्ये राहुल साळुंके, सुदर्शन भोईर, वेदांत शिंदे, कल्पेश म्हसे, प्रतीक वाघकर, निलेश ठोंबरे, संदेश मोहिते, किरण भोईर, राजेश हाबळे, चिन्मय पवार, भूषण भोईर, प्रथमेश देशमुख, कुणाल कांबरी, जीवन भोईर, निखिल खडे, धनंजय भोईर, वैभव कांबरी, रुपेश चव्हाण, तुषार भोईर, संतोष राठोड, निखिल धुळे आदी सहभागी झाले होते.
साळावमध्ये इतिहासकालीन शस्त्रांचे प्रदर्शन
रेवदंडा : प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील साळाव येथे शिवमर्दानी आखाडा तर्फे गुरुवारी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इतिहासकालीन शस्त्र साहित्याचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले होते. ते पाहण्यासाठी परिसरातील इतिहासप्रेमी मंडळींनी मोठी गर्दी केली होती.
या इतिहासकालीन शस्त्र साहीत्य प्रदर्शनात मराठा धोप, मराठा तलवार, आरमारी तलवार, राजपूत तलवार, मुघल तलवार, नागीण तलवार, पदकुंत, आश्वकुंत, दांडपट्टा, भाला, गुर्ज, मराठा कट्यार, मुघल कट्यार, बच्चा धोप, इंग्रज फिरंग, वाघनखे, बिचवा, जांबिया, पट्टा, ढाल, मानाची ढाल, मुघल पट्टा, बाणा, बाणाटी, फरशी, कुर्हाड, कोयता, बाणा पट्टा, गुप्ती, विठा, चामड्याची ढाल, अंकुश, बाण, पंजाबी पाश, जबरदंड, चुकेचा मोठा गोळा, चुकेचा छोटा गोळा, पेशवाई तलवार, तबर, दगडी तोफगोळे, पोलादी तोफगोळे, पट्टीसा तलवार आदी शस्त्रे पहावयास मिळाले. दरम्यान, अलिबाग येथील कुलाबा क्रीडा प्रबोधनीच्या किल्ले रायगड ते अलिबाग या शिवज्योत पदयात्रेचे स्वागत शिवमर्दानी आखाड्याचे संस्थापक किशोर चवरकर, अध्यक्षा सुरेखा चवरकर व प्रशिक्षक शुभम चवरकर यांच्यासह कार्यकर्त्यांनीे केले. या शिवज्योत पदयात्रेत यतीराज पाटील, अक्षय राणे, अमर तुणतुणे, अभिषेक पाटील, प्रणित गांवड, जयेश पाटील, दर्शना पाटील, शिवम ठोंबरे, वेदांती पाटील आदीने सहभाग घेतला होता.