दिवाळी ते दिवाळी या एका वर्षात निफ्टीनं 10 टक्के वाढ नोंदवलीय (11627-12680) तर सेन्सेक्सनं 10.68 टक्के. ही वाढ भव्यदिव्य वाटत नसली तरी मार्च महिन्यामध्ये तळात गेलेल्या बाजारानं मिळवलेली उभारी लक्षणीय ठरली आहे.
दरवर्षी उत्साहानं साजरा केला जाणारा दिव्यांचा सण म्हणजे दीपावली. कोरोना संकटात दिवाळी कशी जाणार, अशी शंका व्यक्त केली जात होती. पण सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले. या गर्दी, उत्साहात खरोखरच कोरोना चेंगरून गेलाय असंच भासतंय आणि त्याला आपला शेअरबाजार देखील अपवाद नाहीये. मागील वर्षातील दिवाळी मुहूर्त सत्र हे रविवारी 27 ऑक्टोबर 2019 रोजी होतं तेव्हापेक्षा आजच्या या मुहूर्त सत्राच्या वेळेस निर्देशांक मागील मुहूर्त सत्राच्या तुलनेत वरतीच आहेत. दिवाळी ते दिवाळी या एका वर्षात निफ्टीनं 9.4 टक्के वाढ नोंदवलीय (11627.15-12719.95) तर सेन्सेक्सनं 10.68 टक्के (39250.2-43443). ही वाढ भव्यदिव्य वाटत नसली तरी मार्च महिन्यामध्ये तळात गेलेल्या बाजारानं मिळवलेली उभारी लक्षणीयच आहे. वर्षाकाठी निफ्टी निर्देशांकानं जरी 10 टक्के वाढ नोंदवली असली तरी मागील वर्षी वाचकांना सुचवलेल्या पोर्टफोलिओनं तब्बल 32 टक्के वाढ दर्शवलीय, अवलोकनासाठी त्याचा तपशील खालील तक्त्यात मांडत आहे.
आता पाहुयात मागील आठवड्यातील लेखात या वर्षीसाठी सुचवलेल्या कंपन्यांबद्दल.
रिलायन्स इंडस्ट्रीज : याबाबत आधीच तीन लेखांमधून तिचं मूल्य अधोरेखीत केलेलं आहे. तांत्रिकदृष्ट्या 1800, 1620 व 1450 या पातळ्या गुंतवणूक वाढवण्यासाठी पूरक वाटतात.
एशियन पेंट्स : माझ्या सेमिनारमध्ये मी एक प्रश्न नेहमी विचारतो की तुमच्या घराला रंग द्यायचाय तर कोणत्या कंपनीचा रंग आणण्यास तुमचं प्राधान्य असेल? तर 90% लोकांचं एकमुखी उत्तर असतं, ’एशियन पेंट्स’. अशी आहे याची ब्रँड व्हॅल्यू. या कंपनीबाबत ग्राऊंड रिपोर्ट घेतल्यास पेंटर्स लोक या कंपनीलाच पसंती देतात. याचं कव्हरेज, अॅव्हरेज व फिनिश यांना तोड नाही. त्याचबरोबरीनं कंपनी आता इंटेरिअर क्षेत्रात देखील उतरलेली असून वैयक्तिक डिझाईन्स व ग्राहकांची शैली जोपासताना त्याला कंपनीद्वारे अत्याधुनिक व्यवसायिक अंमलबजावणीची जोड मिळत आहे. त्याचप्रमाणं रंगकाम म्हटलं की वेळेची गणितं नेहमीच चुकताना आढळतात परंतु यावर देखील कंपनीनं तोडगा आणलाय, कंपनीद्वारे सात दिवसांत रंगकाम करून दिलं जाणार आहे. त्याचप्रमाणं सॅन श्युअर या सेवेद्वारे सॅनिटायझिंगची सेवा देखील कंपनी देत आहे. त्याजबरोबरीनं लाकडी फर्निचरला दीर्घायुषी करण्यासाठी वूड सोल्युशन्स, गळक्या भिंतींसाठी वॉटरप्रूफिंग सोल्युशन्स, कलर कन्सल्टन्सी इत्यादी सेवा देखील कंपनी पुरवताना दिसते. बाजारात पडझड झाल्यास 2070 व 1950 या आसपास या कंपनीमध्ये गुंतवणूक वाढवण्यास हरकत नाही.
ऍव्हेन्यू सुपरमार्ट (डीमार्ट) : संपूर्ण लॉकडाऊनमध्ये एकमेव धंदा असा होता की जो अनेकपटीनं जोरात चालू होता, तो म्हणजे डीमार्टचा धंदा. अनेकांनी घबराहटीमुळं नेहमीपेक्षा अंमळ जास्तच खरेदी करून ठेवलेली होती. तरीही किराणा बाजारपेठेमध्ये संघटित विभागाचं योगदान पाच टक्क्यांहून कमी आहे जे देशातील रिटेल मार्केटच्या दोन-तृतीयांश आहे आणि यामुळंच ग्राहक मूल्य, उत्पादनाची गुणवत्ता, उत्पादकता आणि नफा यावर लक्ष केंद्रित करत ऍव्हेन्यू सुपरमार्ट्स ही गुंतवणुकीसाठी आकर्षक कंपनी वाटते. जरी घटकेस रिलायन्स रिटेल ही जरी थेट स्पर्धक ठरत असेल तरी ही स्पर्धा दोन्ही कंपन्यांना संघटीत कंपन्यांचा रिटेल मार्केटमधील एकूण हिस्सा काबीज करण्यासाठी पूरक ठरेल असं वाटतंय. डीमार्ट प्रत्येक ग्राहकोपयोगी वस्तू योग्य व सवलतीच्या भावात ग्राहकांना उपलब्ध करून देताना आढळत आहे आणि त्याचा मोबदला त्याच्या शेअरच्या भावात रुपांतरीत होत आहे.
जुबिलंट फूड्सवर्क्स : काही कंपन्या ह्या स्वतःचा ब्रँड असा विकसीत करतात की उत्पादनाची ओळखच तो ब्रँड होऊन जाते. उदा. झेरॉक्स (फोटोकॉपी), कॅडबरी (चॉकलेट बार), व्हॅसलिन (पेट्रोलियम जेली), बिसलरी (मिनरल वॉटर), नेसकॉफी (इन्स्टंट कॉफी), फेव्हिकॉल (वूड अधेसिव्ह), कोलगेट (टूथपेस्ट), डिश टीव्ही (डीटीएच). तर काही ब्रँड असे असतात की ती उत्पादनं म्हटलं की हमखास त्या कंपनीचं नांव येतं, उदा. बटर (अमूल), दूध (चितळे), बूट (बाटा), पिझ्झा (डॉमिनोज). तूर्त तरी एकदोन मोजक्याच कंपन्या ’खाण्यास तयार पिझ्झा’ या प्रकारात आहेत. पिझ्झा हट व स्मोकीं जोज हे दोनच स्पर्धक आहेत. कंपनीनं डंकिन डोनट्स याद्वारे डोनट्स तर चमचमीत चायनीजसाठी हॉन्ग्स किचन हे ब्रँड आणले आहेत. स्ट्रीटफूडवर मिळणारा उत्तम पिझ्झा देखील 70-80 रुपयांत मिळतो आणि हाच पिझ्झा घरपोच असा 300 रुपयांच्या पुढेच येतो. हा फरक ओळखून कंपनीनं पिझ्झा मेनिया द्वारे अगदी 70 रुपयांपासून दर्जेदार पिझ्झा उत्पादनं आणली आहेत. अगदी नव्यानंच कंपनीनं बर्गर पिझ्झा व पास्ता पिझ्झा देखील आणले आहेत अशाप्रकारे, एकूणच संघटीत पिझ्झा डिलिव्हरी मार्केटमध्ये ही कंपनी उजवीच ठरते.
उरलेल्या कंपन्यांबाबत पुढच्या लेखात.
सुपर शेअर : इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स
मागील आठवड्यात बाजारात तेजीला उधाण आलं आणि सेन्सेक्स व निफ्टी ह्या भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी आपले आतापर्यंतचे नवीन उच्चांक नोंदवले. निफ्टीनं 12769.75 तर सेन्सेक्सनं 43708.47 हा उच्चांक नोंदवला. याच वर्षी जानेवारीमध्ये निर्देशांकांनी अनुक्रमे 12430.5 व 42273.87 असे उच्चांक नोंदवले होते आणि मार्चमध्ये 7511.1 व 25638.9 हे मागील चार वर्षांमधील नीचांक देखील नोंदवले होते. या आठवड्यात इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स हा शेअर जवळपास 20 टक्क्यांच्या वाढीमुळं सुपर शेअर ठरला. कंपनीनं जाहीर केलेल्या सप्टेंबर अखेरच्या निकालामध्ये मागील तिमाहीपेक्षा निव्वळ नफ्यात 18.5 टक्के वाढ दर्शवलेली आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई अशा मेट्रो शहरांमध्ये कंपनीच्या मालकीच्या प्रॉपर्टिज आहेत आणि 2012 नंतर प्रथमच लॉकडाऊननंतर रिअल इस्टेट मार्केट सुधारताना दिसत असून याचा लाभ या कंपनीची लँडबँक मूल्य सुधारण्यास मदत करेल. कंपनी निधी उभारण्यासाठी देखील प्रयत्नशील असून घर खरेदीदारांसाठी कर्ज देताना याचा कंपनीस फायदा मिळू शकतो. एकूणच 2022पर्यंत प्रत्येकाकडं आपलं हक्काचं घर असावं यासाठी प्रयत्नशील असणार्या मोदी सरकारचे प्रयत्न या हाऊसिंग फायनान्स कंपन्यांच्या पथ्यावरच पडतील असं दिसतंय. सहाच्या आसपास असलेला पी/ई, 17 टक्के लाभांश उत्पन्न आणि पुस्तकी मूल्याच्या अर्ध्या किंमतीत मिळत असलेली कंपनी आकर्षक न वाटल्यासच नवल. तांत्रिकदृष्ट्या देखील 178 रुपयांच्यावर दैनिक तक्त्यावर या शेअरनं ब्रेकआऊट दिलंय.
-प्रसाद ल. भावे (9822075888)
sharpfinvest@gmail.com