चीनमध्ये साथ आलेल्या कोरोना व्हायरसबाबत (ज्याला वुहान व्हायरसही म्हटले जाते.) कोरोना विषाणूमुळे होणार्या कोव्हिड-19ने सध्या जगभर थैमान घातलंय. मृतांचा आकडा 4,200पेक्षा जास्त झाला होता. कोरोना व्हायरसने इतर देशांसारखाच भारतातही प्रवेश केला आहे. राजधानी दिल्लीसह मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, कोच्ची आणि कोलकाताच्या विमानतळांवर थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
आपल्या राज्यात त्यांची संख्या 39 असून देशात 130 झाली असून देशात तीन बळी गेले आहेत. खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये, मॉल, चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकल, बसेस आणि मेट्रो बंद करण्याबाबतही चर्चा सुरू आहे. खासगी कंपन्यांना घरी बसून काम करू देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, पण याचा अर्थ कोरोना व्हायरसची लागण झाली म्हणजे आता मृत्यू अटळ आहे असे अजिबात नाही. संशोधकांना वाटते की दर हजारपैकी मृतांचे प्रमाण हे पाच ते 40 असू शकते, पण सध्याच्या उपलब्ध आकडेवारीनुसार हे प्रमाण हजारात नऊ म्हणजेच साधारण 1 टक्का नक्कीच आहे. म्हणजेच हजारातील 991 लोक बरे होऊन घरी परतत आहेत. 11 जणांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार करणारा बरा झाला. ब्रिटनमध्ये राहणारे उद्योगपती स्टीव्ह वॉल्श जानेवारीत सिंगापूरला गेले होते. तेव्हा त्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला, मात्र ते कळण्याच्या आतच ते सिंगापूरहून फ्रान्सला गेले आणि तिथे एका रिसॉर्टवर थांबले. तिथे त्यांच्यापासून आणखी 11 जणांना लागण झाली. त्यांच्यापैकी पाच जण इंग्लंडमध्ये आले, पाच फ्रान्समध्येच होते आणि एक व्यक्ती स्पेनच्या मायोरका बेटावर आहे. मग मायदेशी परतल्यावर दोन डॉक्टरांना त्यांच्यापासून लागण झाल्यामुळे दोन स्थानिक दवाखानेही बंद करावे लागले होते. अखेर दोन आठवड्यांच्या उपचारानंतर ते आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत. बीबीसीला त्यांनी सांगितले की, डॉक्टरांनी सांगितलेले सगळे मी ऐकले. मला आधी एका खोलीमध्ये वेगळे ठेवण्यात आले होते. मग मला घरीही इतरांपासून दूर राहण्यास सांगण्यात आले. लक्षणे कोरोनाचीच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मला विलगीकरण वॉर्डात ठेवण्यात आले. आता मी तिथेच आहे आणि बचावात्मक उपाय म्हणून माझ्या घरच्यांनाही वेगळे राहायला सांगण्यात आले. सिंगापूरमध्ये राहणार्या जुली कोरोना व्हायरसची लागण झालेल्या देशातल्या पहिल्या काही पेशंट्सपैकी होत्या. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांना कोव्हिड-19 झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना नऊ दिवस विलगीकरण वॉर्डात ठेवण्यात आले होते. आता त्या पूर्णपणे बर्या झाल्या आहेत. मुंबईच्या वेशीवर असलेल्या पनवेलमध्ये कामोठे येथेही एक रुग्ण सापडल्याने नागरिकांत घबराट पसरली. त्यातच पनवेल -उरण तालुक्यातून दुबईला क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या तरुणांच्या टीमचे खेळाडू पनवेलमध्ये परत आले आहेत. त्यांना विमानतळावरूनच महापालिकेने त्यांच्या गाड्या परत पाठवून महापालिकेच्या गाडीतून उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणले होते. सध्या त्यांना खारघर येथील ग्राम विकास भवनात ठेवले आहे. कामोठे येथील कोरोनाचा रुग्ण 13 दिवसांनंतर पॉझिटिव्ह झाला असल्याचे लक्षात आल्याने या टीमच्या सदस्यांना आता 14 दिवस येथे ठेवण्यात आले आहे. त्यांच्यासाठी सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले होते, पण पहिले दोन दिवस त्यांना जेवण, नाष्टा आणि पाणीही वेळेवर मिळत नसल्याची त्यांच्या नातेवाइकांची तक्रार आहे. त्यामुळे उपमहापौर जगदिश गायकवाड यांना त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याची वेळ आली. त्यामुळे काही जण तेथून निघून गेले होते. त्यांना परत आणण्यात आले आहे. त्या ठिकाणी ते क्रिकेट खेळत असल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. सोमवारी सकाळी खारघरला ग्राम विकास भवनाजवळ गेलेल्या पत्रकार आणि छायाचित्रकारांना डबा घेऊन आलेल्या नातेवाइकांनी ग्राम विकास भवनाचे फोटो काढण्यास मज्जाव करून आम्ही गाववाले आहोत, अशी धमकी दिली. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी अशा गाववाल्यांना आता आवरायला हवे. या मुलांमधील कोणी उद्या संसर्ग झालेला निघाला तर त्यामुळे नातेवाइकांसह गावातील लोकांनाही त्याचा त्रास होऊ शकतो. त्या वेळी परिस्थिती गंभीर होण्यापेक्षा आताच काळजी घेणे आवश्यक आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी त्यांना जाणीव करून दिली पाहिजे की कोरोनाकडे भेदभाव नाही, गाववाल्यांनाही तो होऊ शकतो. इटलीने कर्फ्यू लावण्यात खूप उशीर केला. ज्याप्रमाणे चीनने केले ते इटलीने केले नाही. म्हणून इतके बळी नाहक गेलेत. चीननंतर इटली व इतर युरोपियन देश, इराण आता याच्या विळख्यात आहेत. इटलीमध्ये सध्या यातील तिसरी स्टेज आहे, तर अमेरिकेत दुसरी स्टेज आहे. भारतात आपण पहिल्या स्टेजमधून दुसर्या स्टेजमध्ये जात आहोत. तिसरी स्टेज म्हणजे महाभयंकर अशी साथ पसरणे. (भारत सरकारचा प्रयत्न आहे की दुसर्या स्टेजलाच प्रसार थांबला पाहिजे.) परंतु बेशिस्त भारतीय नागरिक साथ देत नाहीत. चीनने जगाला दाखवून दिले आहे की हा आजार फक्त आणि फक्त कर्फ्यू लावला तरच रोखला जाऊ शकतो. भारतात अजूनही सर्व शहरे सुरू आहेत. येणे-जाणे, दळणवळण चालू आहे. ज्यांना लागण झाली आहेत असे पेशंट्स हॉस्पिटलमधून पळून जात आहेत. आपण अजूनही समारंभ, जयंत्या, सोहळे साजरे करणे सोडले नाहीत. लक्षात घ्या ही राष्ट्रीय आपत्ती आहे. देशाच्या व तुमच्या भविष्याचा विषय आहे. कृपया हे पण समजून घ्या की लसूण, कापूर, तपकीर, गोमूत्र ह्या विषाणूला जास्त तापमानात काही होत नाही. (दुबई, सौदी अरेबियामधून लागण होऊन लोक आपल्याकडे आले आहेत. तिथे काय कमी तापमान आहे?) आणि इतर अफवा या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. स्वतःची योग्य काळजी घेणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. बाहेर न फिरणे हाच एकमेव उपाय आहे. सुट्या जाहीर केल्या याचा अर्थ तुम्ही फक्त आणि फक्त घरात बसणे अपेक्षित आहे. भारतासाठी पुढील 30-45 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. हा युद्धाचा प्रसंग आहे. घरातच थांबा. हात धुणे, तोंडाला रुमाल, सार्वजनिक ठिकाणी न जाणे, सरकार व जागतिक आरोग्य संघटना सांगेल ते पाळणे, तसेच लक्षणे दिसल्यास डॉक्टरांच्या निदर्शनास आणून द्या आणि घरी किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात त्वरित दाखल व्हा.
-नितीन देशमुख, खबरबात