माणगाव : प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीबरोबर वेळोवेळी शारीरिक संबध करुन तीचे गरोदरपणास कारणीभुत ठरलेल्या तीन नराधमास माणगांव येथील विशेष व सत्र न्यायालयाने सक्तमजुरीची व दंडाची शिक्षा सूनावली आहे. शंकर उर्फ बंड्या सुदाम वाघमारे, नरेश गोविंद हांडे आणि रामदास पदाजी हांडे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील पीडित मुलगी अल्पवयीन आहे, हे माहीत असूनही शंकर उर्फ बंड्या सुदाम वाघमारे, नरेश गोविंद हांडे आणि रामदास पदाजी हांडे या आरोपींनी गावातील स्मशानभुमीजवळ एप्रिल आणि मे 2017 या कालावधीत सदर मुलीबरोबर वेळोवेळी शारीरिक संबध केले. त्यातून पीडित मुलगी गरोदर राहिली. या प्रकरणी फिर्याद दाखल होताच आरोपींविरुध्द दिघी पोलीस ठाण्यात भादविसं कलम 376 (आय), (षएन), सह लैगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,5 (जे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. टी. सोनके यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपींविरुध्द माणगाव येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्यात पीडित मुलीची साक्ष व डीएनए अहवाल महत्वाचा पुरावा ठरला. या खटल्यामध्ये सहाय्यक सरकारी वकील योगेश तेंडूलकर यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले. सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी शशिकांत कासार, छाया कोपनर व पोलीस हवालदार शशिकांत गोविलकर यांनी सहकार्य केले. विशेष व सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांनी सदर गुन्ह्याच्या शाबितीनंतर आरोपींना दोषी ठरवून सोमवारी (दि. 16) शंकर उर्फ बंड्या सुदाम वाघमारे आणि नरेश गोविंद हांडे या दोन आरोपींना प्रत्येकी 7 वर्ष सक्तमजूरी व प्रत्येकी 25 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास तसेच रामदास पदाजी हांडे यांस 10 वर्ष सक्तमजूरी व 50हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.