Breaking News

पुढील उपाययोजनांच्या दिशेने

देशातील जनता एव्हाना लॉकडाऊनमधील जीवनशैलीला बर्‍यापैकी रूळली असून आता पुढील उपाययोजनांच्या दिशेने थोड्याफार हालचालीही सुरू झाल्या आहेत. काही राज्ये आपल्या स्थलांतरित मजुरांना नेण्याच्या तयारीत असून सगळ्यांच्याच नजरा आता 3 मेच्या दिशेने लागल्या आहेत.

लॉकडाऊनला आता महिना पूर्ण झाला आहे. सुरुवातीला प्रचंड गैरसोयीच्या वाटलेल्या लॉकडाऊनमध्ये एव्हाना देशभरातील बहुतांश जनता रुळली आहे. अर्थात सगळ्यांच्या नजरा आता 3 मेच्या दिशेने लागल्या आहेत आणि प्रत्येकालाच पुन्हा जगणे पूर्ववत कधी होईल याचीच ओढ आहे. अर्थात अनेक ठिकाणी अजुनही खरेदीसाठी उसळणारी गर्दी सरकारी यंत्रणेला चिंताक्रांत करते आहे. पण तरीही बहुतांश लोक लॉकडाऊनचे शक्य तितके पालनही करीत आहेत. म्हणूनच काही प्रमाणात देशातील कोरोनाची साथ नियंत्रणात आल्याचे व भारताच्या कोरोना संकटाच्या हाताळणीचे कौतुकही झाले आहे. आता थोड्याफार त्यापुढील हालचाली सुरू झाल्या असून काही राज्यांनी अन्य राज्यांत अडकलेले आपले विद्यार्थी वा स्थलांतरित मजूर आदींना कशातर्‍हेने स्वगृही परत आणता येईल याच्या योजना आखण्यास सुरूवात केली आहे. मेट्रोनेही लॉकडाऊन उठल्यानंतर मेट्रो सेवा कशातर्‍हेने सुरू करता येईल याची पडताळणी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशात अन्य राज्यात अडकलेल्या सुमारे 15 लाख मजुरांना परत आणून प्रारंभी 14 दिवस विलगीकरणात ठेवून नंतर स्वगृही पाठवण्याची आखणी सुरू झाली आहे. तर बिहारने राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या बिहारी विद्यार्थ्यांना परत नेता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणींच्या संदर्भात आपण संवेदनशील असलो तरी त्यांना परत आणण्यामुळे लॉकडाऊनच्या नियमांचा भंग होईल, त्यामुळे तसे करता येणार नसल्याचे बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी पाटणा उच्च न्यायालयात सांगितले आहे. अनेक राज्यांतील एकंदर 40 हजार विद्यार्थी राजस्थानातील कोटा येथे अडकले असून यात महाराष्ट्राच्या 1800 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एकीकडे या घडामोडी सुरू असतानाच कोरोना रुग्णांमध्ये प्लाझ्मा थेरपीची पडताळणी करण्याच्या प्रयत्नांना यश येताना दिसत असून दिल्लीत चार रुग्णांमध्ये हे प्रयत्न यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. मात्र तरी या उपायाबद्दल ठामपणे बोलण्यास आणखी किमान दोन आठवड्यांचा कालावधी लागेल, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी म्हटले आहे. प्लाझ्मा थेरपीमध्ये बर्‍या झालेल्या कोरोना रुग्णामधील प्लाझ्माचा वापर अन्य गंभीर अवस्थेतील कोरोना रुग्णांमध्ये केला जातो. महाराष्ट्रातही प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्याची परवानगी आता देण्यात आली आहे. देशातील बर्‍या झालेल्या कोरोना रुग्णांचा दरही आता 20.57 टक्क्यांच्या वर गेला आहे. मात्र देशात कोरोनाबाधितांची संख्याही दिवसागणिक वाढतेच आहे. शुक्रवारी देशभरातून 1752 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली व एकूण रुग्णांची संख्या 23,452 वर गेली. याच काळात पनवेल महापालिका क्षेत्रांत दोन नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे महापालिका क्षेत्रात 44 पॉझिटिव्ह रुग्ण झाले. पनवेल तालुक्यातही एक रुग्ण वाढल्याने तालुक्यातील रुग्णांची संख्या 52 तर रायगडमध्ये 64 झाली आहे. दरम्यान भारतातील कोरोना संकट काहिसे नियंत्रित दिसत असले तरी भारताने लॉकडाऊन उठवण्याची घाई करू नये, असा सल्ला द लँसेट या अत्यंत मान्यताप्राप्त वैद्यकीय प्रकाशनाचे प्रमुख संपादक रिचर्ड हॉर्टन यांनी दिला आहे. अर्थात भारताचे खंबीर नेतृत्व यासंदर्भात दिशहिताचा सुयोग्य निर्णयच घेईल.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply