स्थानिक व रेस्क्यू टीमच्या मदतीने आणले खाली
पाली, खोपोली : प्रतिनिधी
सुधागड पालीतील सरसगड किल्ल्याच्या पायर्यांवरून घसरून रविवारी (दि. 21) सायंकाळच्या सुमारास एक तरुण खाली पडला. त्याचा डावा हात फॅक्चर झाला असून खांदा निखळला आहे व कमरेला मुका मार लागला आहे. स्थानिक तरुण व खोपोली येथील यशवंती हायकर्स टीमने या जखमी तरुणाला गडाखाली आणून पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आले. मुकुल जोशी (रा. मुलुंड, मुंबई) असे या जखमी तरुणाचे नाव आहे. तो चक्रम हायकर्स टीमचा सदस्य आहे. रविवारी अनेक जण सरसगडावर ट्रेकिंगसाठी आले होते. पावसाळा असल्याने किल्ल्याच्या पायर्या निसरड्या झाल्या आहेत. मुकुल हा वरच्या पायरीवरून पाय घसरून थेट खाली कोसळला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुण अमित निंबाळकर, प्रदीप (दादू) गोळे, ज्ञानेश्वर जगताप, दर्शन तळेकर, रोहन राऊत, संकेत राऊत, सुमित राऊत अभिजीत वरंडे, व विवेक गुंड यांनी या तरुणाला स्ट्रेचरवरून खाली आणले. खोपोली येथील यशवंती हायकर्सचे सदस्य पद्माकर गायकवाड, महेंद्र भंडारे, रजाबापू, सगळगीले, मच्छिंद्र यादव, सनिज मांडलेकर, तुषार सावंत, निखिल गुरव, हरेश कोळी, पूजा सावंत, महेश मोरे यांनीही कामगिरी बजावली.