नवी मुंबई : बातमीदार
संसर्गाचा धोका पत्करून नागरिकांवर उपचार करणार्या या डॉक्टरांच्या जीविताला देखील धोका संभवतो. त्यामुळे त्यांची सुरक्षितता जपणे अत्यावश्यक आहे. या डॉक्टरांना अधिक आत्मविश्वासपूर्वक वैद्यकीय उपचाराची सेवा करता यावी यासाठी त्यांना महापालिकेने पीपीई किट, सॅनिटायझर आणि दवाखान्यासाठी सॅनिटायझर सारख्या सुरक्षा साधनांचा पुरवठा मोफत करावा, अशी मागणी देखील आमदार नाईक यांनी महापालिकेकडे केलेली आहे.
नवी मुंबईमध्ये आपापल्या परिसरामध्ये वैद्यकीय उपचाराची सेवा पुरविणारे खासगी डॉक्टरांनी कोरोनाचा संसर्ग वाढल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून आपले दवाखाने बंद केले होते. ताप, सर्दी खोकला यासारख्या आणि इतर छोट्या-मोठ्या आजारांवर उपचार करून घेण्यासाठी नागरिक या डॉक्टरांकडे जात असतात. इतर आजारांवर उपचार करण्याबरोबरच कोरोना सदृष्य रुग्ण आढळल्यास हे डॉक्टर याची माहिती पुढे महापालिकेला देखील देऊ शकतात. वेळीच कोरोना बाधित असल्याचे निदान झाल्यास संबंधित रुग्णास वेळेवर उपचार मिळून तो लगेच बराही होऊ शकतो. आमदार गणेश नाईक यांनी डॉक्टर आणि त्यांच्या संघटनांबरोबर चर्चा करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. आमदार नाईक यांनी आवाहन केल्यानंतर अनेक डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने सुरू केले आहेत. त्यामुळे नागरिकांची वैद्यकीय उपचाराची गैरसोय दूर होऊ लागली आहे.
– प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक वस्तू पुरवा एखाद्या विभागात कोरोनाचा रुग्ण आढळल्यास तो विभाग सील करून प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केला जातो. या विभागातून बाहेर येण्या जाण्यास परवानगी नसते. अशाप्रकारे जाहीर केलेल्या काही प्रतिबंधात्मक विभागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे होत नसल्याच्या तक्रारी पुढे आलेल्या आहेत. त्यामुळे या प्रतिबंधात्मक क्षेत्रातील रहिवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते याकरिता भाजीपाला, किराणामाल, दूध यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विनाअडथळा या विभागातून घरोघरी सुरू रहावा याची दक्षता महापालिकेने घ्यावी, अशी मागणी देखील आमदार नाईक यांनी महापालिकेकडे केली आहे.