पेण ः प्रतिनिधी
राज्यातील प्रमुख मीठ उत्पादक जिल्हा म्हणून रायगडची ओळख होती. त्यामध्ये पेणचे नाव आवर्जून घेतले जात असे, आज मात्र ही ओळख नामशेष होत चालली आहे. शासनाचे उदासीन धोरण आणि मीठ व्यावसायिकांसमोरील अडचणींमुळे मिठागर व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. काही तालुक्यांत मिठागर व्यवसायाला पोषक धोरणाची स्थिती निर्माण करण्याची मागणी मीठ उत्पादकांकडून केली जात आहे. आजघडीला मीठ शेती बहरली आहे, पण लॉकडाऊनचा फटका आता मीठ तयार करणार्या मिठागरांनाही बसला आहे. मागील काही दिवसांपासून मिठागरांमध्ये मीठ तयार असून तयार झालेले मीठ उचलण्यासाठी मजूर मिळेनासे झाल्याने हे मीठ कारखान्यापर्यंत पोहचणे जिकिरीचे झाले आहे. सध्या रायगड जिल्ह्यात तीन हजार टन मिठाचे उत्पादन घेतले जात आहे. रायगड जिल्ह्यात एकेकाळी दरवर्षी जवळपास 30 हजार टन मिठाचे उत्पादन घेतले जात होते.आज हे उत्पादन घटून केवळ तीन हजार टनावर आले आहे. हे उत्पादन पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील 12 हजार एकर क्षेत्रात घेतले जात आहे. मिठागर व्यावसायिकांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कामगारांची कमतरता, खाडीपट्ट्यातील प्रदूषण आणि राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे व्यवसायासमोरील अडचणींत भर पडली आहे. गेल्या दोन दशकांत धरमतर खाडीपट्ट्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या आल्या आहेत. या औद्योगिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे मीठ उत्पादनावर परिणाम झाल्याची माहिती मीठ उत्पादकांनी दिली आहे.