कडाव ः वार्ताहर
कर्जत तालुक्यामधील कडाव येथे असणार्या बँक ऑफ इंडियात खातेदारांची नेहमीच प्रचंड गर्दी असते, पण सध्या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे बँक ऑफ इंडिया कडाव शाखेच्या वतीने कोरोनाला रोखण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून बँक व्यवस्थापक तुकाराम रुपनुर व बँक कर्मचार्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. कडावमधील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये सध्या खातेदारांची मोठी रीघ लागलेली असते. दररोज सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सरासरी 200पेक्षा अधिक खातेदार आपल्याला कामासाठी बँकेत ये-जा करीत असतात. त्यामुळे तेथील बँक प्रशासन आरोग्याच्या दृष्टीने कठोर पावले उचलत असून पुरुष खातेदाराने आपल्या तोंडाला रुमाल, मास्क किंवा महिला खातेदाराने ओढणी लावली आहे का? जर मास्क किंवा रुमाल नसेल तर अशा ग्राहकांना बँकेत प्रवेश दिला जात नाही. तसेच एकावेळी फक्त एकाच खातेदाराला आत सोडले जात असून चोख व्यवस्था बँकेकडून बजावली जात आहे.