Breaking News

लक्ष्मणशेठ यांचे जाणे म्हणजे कुटुंबातील व्यक्तीचे जाणे

सर्वपक्षीय शोकसभेत व्यक्त झाल्या भावना

पनवेल : रामप्रहर वृत्त
सामाजिक, राजकीय, उद्योग आदी क्षेत्रात सातत्याने आपल्या कार्याचा आदरयुक्त दबदबा राखलेले स्व. लक्ष्मणशेठ पाटील यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर झालेल्या आघाताने संपूर्ण पनवेलला दुःख झाले. त्यांच्या निधनाने आपल्याच कुटुंबातील व्यक्ती हरपल्याची भावना गुरुवारी (दि. 19) पनवेल येथे झालेल्या शोकसभेत व्यक्त झाली.
नावडे गावातील लक्ष्मणशेठ पाटील (म्हात्रे) हे पनवेल तालुक्यातील बडे प्रस्थ आणि भाजपचे ज्येष्ठ नेते होते. प्रेमळ, मनमिळावू, मितभाषी आणि हसतमुख स्वभावाचे लक्ष्मणशेठ यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. तत्पूर्वी त्यांची पत्नी जनाबाई यांचे, तर त्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र अविनाश यांचेही निधन झाले. या तिहेरी आघातामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर एकापाठोपाठ एक दुःखाचे डोंगर कोसळले. काही दिवसांच्या अंतराने आई, वडील आणि मुलगा यांचे निधन झाल्याने नावड्यासह पनवेल तालुका हळहळला. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी पनवेल तालुका भाजपच्या वतीने गुरुवारी (दि. 19) सायंकाळी पनवेल शहरातील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी शोकसभेत मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करताना लक्ष्मणशेठ पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचे निधन मनाला चटका लावून गेल्याचे म्हटले. या वेळी सर्व उपस्थितांनी पाटील (म्हात्रे) कुटुंबीयांचे सांत्वन केले.
या वेळी श्रद्धांजली वाहण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवीशेठ पाटील, आमदार महेश बालदी, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, काँग्रेस नेते आर. सी. घरत, डॉ. भक्तीकुमार दवे, कामगार नेते महेंद्र घरत, अरविंद सावळेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस नितीन पाटील, शिवसेनेचे महानगर प्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पाटील, जे. डी. तांडेल, स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे आदींसह नगरसेवक, नगरसेविका, विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘लक्ष्मणशेठ आणि मी जिवाभावाचे राम-लक्ष्मण होतो’
तिघांचे एकाएकी आपल्यातून निघून जाणे ही सर्वांना धक्का देणारी बाब आहे. लक्ष्मणशेठ थोडेफार आजारी असायचे, पण ते कधीही अंथरुणाला खिळले नाहीत. जनाबाई या आजारी असताना लक्ष्मणशेठ त्यांची भरपूर काळजी घ्यायचे. वेळेवर औषधपाणी आणि त्यांची सेवा करायचे. अविनाश तरुण तडफदार मुलगा, पण त्याला आजार आला आणि अचानकपणे तो आपल्यातून निघून गेला यावर विश्वासच बसत नाही. कारण या कुटुंबवत्सल माणसांनी सर्वांना आपला लळा लावला होता. आईचे प्रेम जसे मुलांवर असते तसे प्रेम त्यांचे सर्वांवर होते. लक्ष्मणशेठ आणि मी जिवाभावाचे राम-लक्ष्मण होतो. ते आपल्या मनात घर करून राहिले आहेत, त्यामुळे ते आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही. त्यांच्या निधनाने मनाला मोठा धक्का बसला आहे, या दुःखातून सावरण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला बळ मिळो.

लक्ष्मणशेठ आणि माझा 40 वर्षे संपर्क होता. एक दिवसाआड आमचा एकमेकांना फोन असायचा. अजातशत्रू असे ते व्यक्तिमत्त्व होते. जनाबाईंची ते खूप काळजी घ्यायचे. धडधाकट माणूस आपल्यातून निघून जातो तेव्हा मनाला खूप त्रास होतो. लक्ष्मणशेठच्या आठवणी या मोलाच्या आहेत. त्यांच्या निधनानंतर मी दोन दिवस झोपलो नाही. घरातील तीन व्यक्ती अचानकपणे आपल्यातून निघून जाणे हा खूप मोठा आघात आहे.
-आमदार रवीशेठ पाटील

डोंगराएवढे दुःख पाटील कुंटुंबावर कोसळले. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची ताकद देवो. लक्ष्मणशेठ पाटील यांचे राजकारणापलीकडे सर्वांशी चांगले संबंध होते. खेडोपाड्यात तळागाळात पोहोचलेला एक नेता आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारे आणि मित्रत्वाचे नाते जपणारे होते. नियतीने घाला घातला. नियती किती क्रूर असते हे या दुःखद घटनेने दाखविले.
-बाळासाहेब पाटील, माजी सभापती कोकण म्हाडा

माणूस जन्माला आल्यावर त्याचा मृत्यू अटळ आहे, पण या घटनेचे दुःख सहन होणारे नाही. ही तीनही माणसे आपल्या नजरेसमोर असताना त्यांचे अचानकपणे निधन होणे अविश्वसनीय आहे.
-आर. सी. घरत, काँग्रेस नेते

माझ्या वयापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीच्या शोकसभेत बोलताना अंतःकरण जड होत आहे. लक्ष्मणशेठ पाटील यांचे सर्वांशी मैत्रीपूर्ण नाते होते. हॉस्पिटलला दाखल होण्यापूर्वी ते मला सतत फोन करून सांगायचे, डॉक्टर तुम्ही बाहेर फिरू नका कोरोनाचा आजार वाईट आहे, पण काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले. संवेदनशील, भावनाप्रधान, प्रेमळ स्वभावाचे होते. फणसाच्या गर्‍याप्रमाणे व्यक्तिमत्त्व असलेल्या या व्यक्तींचे अकाली निधन एक मोठा अपघात आहे.
-डॉ. भक्तीकुमार दवे

ही तीनही प्रेमळ माणसे कुटुंबवत्सल होती. त्यांच्या निधनाने सर्वांना खूप दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबाला यातून सावरण्याची शक्ती मिळो.
-जगदिश गायकवाड  

जेथे जन्म आहे तेथे मृत्यू अटळ आहे. अकाली निधन वेदनादायी असते त्याचप्रमाणे लक्ष्मणशेठ यांच्याबाबतीत झाले आहे. त्यांना श्रद्धांजली वाहायला लागणे हा आपल्या आयुष्यातील दुःखद दिवस आहे.
-रामदास शेवाळे

पक्षभेदभाव न करता काम करणारे असे हे व्यक्तिमत्त्व होते. आपल्याकडे मदतीसाठी आला आणि त्याला मदत केली नाही असे कधी लक्ष्मणशेठ यांच्याकडून झाले नाही. पनवेलच्या जडणघडणीत त्यांचा स्पर्श आहे. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
-सतीश पाटील

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात विकासाचा धडाका सुरू आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …

Leave a Reply