माणगाव : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावमधील काळ नदी पुलाजवळ केरकचरा टाकण्यात येत होता. तो पावसात कुजून परिसरात पसरलेल्या दुर्गंधीने रिक्षा चालक, प्रवासी, नागरिक हैराण झाले होते. त्याबाबत बुधवारी (दि. 30) दै. रामप्रहर वृत्त प्रसिद्ध होताच माणगाव नगरपंचायतीला जाग आली. मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी नगरपंचायतीचे सफाई कामगार पाठवून सदरचा कचरा त्वरीत उचलला. माणगावमधील काळ नदी पुलाजवळ लोणेरे मार्गावर तसेच घरोशीवाडी याठिकाणी पूर्व विभागाकडे चालणार्या मिनिडोर रिक्षा उभ्या असतात. या ठिकाणी मोठ्याप्रमाणावर केरकचरा टाकण्यात आला होता. तो कुजून परिसरात दुर्गंधी भरुन राहिली होती. त्याचा त्रास रिक्षा चालक, मालक, प्रवासी आणि नागरिकांना होत होता. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली होती. या बाबत दै. रामप्रहर मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच माणगाव नगरपंचायतीने येथील कचरा उचलून परिसर स्वच्छ केला. येथील मिनीडोर रिक्षा चालक, मालक तसेच प्रवासी व नागरिकांनी दै.रामप्रहर चे आभार मानले आहेत.