उत्पादन घटले; शासनाकडे मदतीची मागणी
मुरूड ः प्रतिनिधी
यंदाचे सतत बदलते वातावरण तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोकणातील आंब्याचे उत्पादन 35 ते 40 टक्क्यांनी घटल्याने आंबा बागायतदार शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्या अनुषंगाने त्यांना शासनाने मदत करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने केली आहे.
हवामान बदलावर मात करून कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व अन्य जिल्ह्यांतील आंबा उत्पादक शेतकर्यांनी मार्चपासून आपल्या उत्पादनास अंशतः सुरुवात केली होती, मात्र यादरम्यान कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. परिणामी कोकणातील बागांमध्ये तयार झालेल्या फळांच्या राजाच्या विक्रीवर संकट कोसळले. कोकणातील 50 टक्के आंबा राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत ठोक स्वरूपात वाशी, पुणे, सांगली, कोल्हापूर आदी ठिकाणी विक्री केला जातो. उर्वरित विक्री राज्यातील शहरातील मोठ्या व छोट्या मंडया, कृषी पणन मंडळ अंतर्गत आठवडी बाजार, आंबा फेस्टिव्हल, देशांतर्गत बाजारपेठा व देशाबाहेर निर्यात होते.
लॉकडाऊनमुळे सध्या या सर्व माध्यमांतर्गत विक्रीच ठप्प झाली आहे. एकीकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील हंगाम संपत असताना रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांतील आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे, पण विक्री व्यवस्थेअभावी आंबा बागायतदार शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली.
संघाच्या पाठपुराव्याने आंबा, फळफळावळ, भाजीपाला व सर्व प्रकारच्या फलोत्पादन विक्रीसाठी कृषी विभागाच्या माध्यमातून परवाने मंजूर केले आहेत. या संधीचा लाभ घेऊन संघाच्या वतीने कोकणात जास्तीत जास्त शेतकर्यांना परवाने मिळवून देण्याचे प्रयत्न केले आहेत. काही दिवसांसाठी सुरू करण्यात आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने ती बंद करण्यात आली. त्याबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेशातील आंब्यांचे आक्रमण, कोकणातील मालवाहतूकदार गाड्यांना गावबंदी तसेच तालुका व जिल्हाबंदी, कोरोनाच्या चक्रात जायबंदी होणे आदी अनंत अडचणींना तोंड देताना आंबा उत्पादक बागायतदार अक्षरशः कोंडीत सापडले आहेत. यातून मार्ग काढून बागायतदार शेतकर्यांना धीर द्यावा यासाठी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने पणनमंत्र्यांकडे अभ्यासपूर्वक पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
आंबा बागायतदारांच्या उत्पादनात झालेली घट, उत्पादन येऊनही अपेक्षित भाव न मिळणे आदींसाठी राज्य शासनामार्फत आंबा उत्पादक शेतकर्यांना नुकसानभरपाईपोटी अनुदान देण्यात येते. याच अनुषंगाने तसेच केंद्र सरकारने घोषित केलेल्या आर्थिक पॅकेजमधून आर्थिक सहकार्य मिळावे, जेणेकरून कोकणातील शेतकरी या संकटातून मुक्त होईल.
-चंद्रकांत मोकल, अध्यक्ष, म. रा. आं. उ. सं.
मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे यंदा मुरूड तालुक्यातही 35 ते 40 टक्केच आंब्याचे उत्पादन झाले आहे. त्यात आंबा तयार झाला असताना आलेल्या कोरोना संकटामुळे तो पार देशोधडीला लागला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत शासनाने मदत करावी.
-अरविंद भंडारी, आंबा बागायतदार शेतकरी, मुरूड