Breaking News

प्रथिनांचे मूल्यमापन

आरोग्य प्रहर

शरीरातील स्नायूंच्या पोषणासाठी व हाडांच्या मजबुतीसाठी आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश आवश्यक आहे, मात्र शारीरिक हालचालीच्या तुलनेत या प्रथिनयुक्त पदार्थांचा अतिरेक झाला, तर याचे दुष्परिणामही होतात. त्यामुळे प्रथिनयुक्त पदार्थ घेताना योग्य ती काळजी घ्यावी.

मटण, चिकन, मासे, अंडी, दूध, चीज, पनीर हे पदार्थ प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत. त्यामुळे न्याहारीच्या वेळी अंडी आणि दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. या पदार्थांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याने यातून मिळणारा उष्मांक दिवसभर पुरतो आणि पोट भरल्याची जाणीव होते. फक्त शाकाहारी असणार्‍यांना दुधाव्यतिरिक्त कडधान्ये, सर्व प्रकारच्या डाळी यातून काही प्रमाणात प्रथिने मिळतात. मासे, चिकन याप्रमाणे हे प्रथिनांचे उत्तम स्रोत नाहीत, मात्र शाकाहारी आहारात सोयाबीन हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. याशिवाय कडधान्ये व डाळी हे दोन्ही पदार्थ एकत्र खाणे उपयुक्त ठरते. याचसाठी शाकाहारी आहारात वरण-भात, वरण-पोळी अशा प्रकारे खाद्यपदार्थांची जुळवाजुळव केल्यानेही प्रथिने योग्य प्रमाणात शरीरात जातात, मात्र या डाळींचे सेवन करताना त्या शिजवून खाणे शरीरासाठी चांगले. न शिजवलेल्या डाळींमधील प्रथिने पचायला जड असतात.

प्रथिने उष्मांकाच्या स्वरूपात शरीरात साठवली जातात. हे उष्मांक स्नायूंमध्ये जमा होतात. जर या उष्माकांचा वापर केला नाही, तर रोजच्या सेवनातून या उष्मांकाचे थर साचले जातात. प्रथिनांचे सेवन केल्यानंतर त्याचा वापर करणे, शरीराची हालचाल किंवा व्यायाम करणे आवश्यक आहे. असे केले नाही तर लठ्ठपणा वाढीस लागतो. काही वेळा सांधेही दुखतात. या अतिरिक्त प्रथिनांच्या सेवनामुळे मूत्रपिंडावर ताण येतो. अनावश्यक गोष्टी शरीराबाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम मूत्रपिंड करीत असते. अशा वेळी शरीराला आवश्यक नसलेले प्रथिने शरीराबाहेर काढण्यासाठी मूत्रपिंडाला जास्त काम करावे लागते. यातून मूत्रपिंडासंबंधित आजार निर्माण होतात. याशिवाय शरीराबाहेर अनावश्यक गोष्टी टाकताना शरीरातील पाणीही बाहेर टाकले जाते. या कारणामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येतो. आपण आहारात घेत असलेल्या प्रथिनांचे प्रमाण आणि दैनंदिन जीवनातील शारीरिक हालचाली यावर शरीराला किती प्रथिनांची आवश्यकता आहे याची गरज लक्षात येते. खेळाडू किंवा शरीराची हालचाल जास्त प्रमाणात करणार्‍या व्यक्तींना प्रथिनांची आवश्यकता जास्त असते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply