नवी मुंबई : बातमीदार
कोरोनाने नवी मुंबई शहराला रेड झोनमध्ये आणले आहे. एकाबाजूला कोरोनाने आर्थिक व सामाजिक व्यवस्थेला खीळ बसवलेली असताना पालिकेने नागरिकांच्या व शहराच्या हिताला प्राधान्य देत पावसाळा पूर्व नालेसफाईला व अर्धवट राहिलेली विकासकामे पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. 25 मे पर्यंत डेडलाईन ठेवलेली असली तरी कोरोनामुळे कामगारांचा प्रश्न निर्माण झाला असल्याने मर्यादा वाढण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई पालिकेच्या हद्दीत एकूण 74 नाले येतात. त्यातील अनेक नाले एमआयडीसी भागातून येतात. नवी मुंबई शहराची रचना एकबाजूला सागरी किनारा तर दुसर्या बाजूस डोंगर रांगा अशी आहे. त्यामुळे जोरदार पाऊस पडल्यास व त्याचवेळेस भरती आल्यास डोंगरावरून घरंगळत येणारे, शहरात साठणार व भरतीमुळे पडणारे पाणी अशा परिस्थितीमुळे अनेकदा नवी मुंबईत पाणी साठण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पावसाळापूर्व नालेसफाई करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. नवी मुंबईत देखील अनेक झोपडपट्टी भाग हे नाल्यालगत आहेत. नाले तुंबून रोगराई वाढल्यास रुग्णालयांना हा भार सावरणे कठीण होणार आहे.
कोरोनामुळे अनेक कामगार गावी गेले असल्याने कामगारांचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळत मिळतील त्या कामगारांसह नाले व गटार सफाई, खोदकामे, मॅनहोल कव्हर करणे सुरू आहे. कामगारांना मास्क, सॅनिटायजर, ग्लोज, गंबुट देण्यात आले असून पाच पेक्षा जात कामगार एकत्र येणार नाहीत याची खबरदारी घनकचरा विभागाने घेतली आहे.
मार्च महिन्यात होणारी पालिकेची निवडणूक पाहता त्याआधी पालिकेने कोट्यवधींची शहरातील कामे मंजूर करून घेतली होती. त्या कामांना सुरुवात झाल्यावर मात्र कोरोनाने ही सर्व कामे ठप्प झाली होती. त्या कामांना देखील पालिकेने गती दिली असून पावसाळ्याआधी यातील अनेक कामे पूर्ण करण्याच्या प्रयत्नात पालिका आहे. यात रस्त्यांचे काँक्रीटीकरण, डांबरीकरण, गटार दुरुस्ती याव्यतिरिक्त अनेक कामे आहेत. दरवर्षी सिडको, रेल्वे, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील नाले, कल्व्हर्टची साफसफाई देखील त्या त्या प्राधिकरणांना पावसाळ्यापूर्वी करावी लागणार आहे.