आरोग्य प्रहर
प्रसूतीनंतर तासाभरातच बाळाला स्तनपान करणे गरजेचे असले तरी अनेक खासगी रुग्णालयांमध्ये सिझेरियन पद्धतीने प्रसूती झाल्यांनतर बाळाला सर्रास पावडरचे दूध पाजण्याकडे खासगी रुग्णालयांचा कल वाढत आहे.
एकीकडे सिझेरियन झालेल्या मातेला पहिले 24 तास स्वत:हून मुलाला जवळ घेऊन दूध पाजणे शक्य नसते आणि दुसरीकडे बाळ बाहेर आल्यानंतर आईद्वारे होणारा साखरेचा पुरवठा खंडित झाल्याने त्याच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी व्हायला लागते. अशा वेळी कठीण परिस्थिती निर्माण होते. अशा परिस्थितीत स्तनपानाविषयी मार्गदर्शन करणे, मदत करणे या वेळखाऊ कामापेक्षा बाळांना पावडरचे दूध देण्याचा सोपा मार्ग रुग्णालये अवलंबताना दिसून येतात.
पूर्वी सिझेरियनच्या वेळी संपूर्ण अंगामध्ये भूल दिली जात असे. यामुळे शस्त्रक्रिया करताना आई बेशुद्धावस्थेत असायची. शिवाय संपूर्ण अंगामध्ये भुलीचे औषध असल्याने दुधावाटे ते बाळाला जाण्याचा धोका होता. म्हणून मग सिझेरियननंतर आई शुद्धीवर आल्यावर किंवा जास्तीत जास्त चार तासांनी स्तनपान देण्याची शिफारस करण्यात आली होती, परंतु आता कमरेतून भूल दिली जाते. यामुळे आईच्या कमरेखालील भागात संवेदना नसते, मात्र ती शुद्धीत असते. तसेच यात आईच्या रक्तात भुलीचे औषध जात नसल्याने बाळालाही दुधावाटे ते जाण्याचा संभव नसतो. तेव्हा एकीकडे शस्त्रक्रिया सुरू असतानाच खांद्याकडील बाजूने बाळाला उलटे ठेवून स्तनपान करणे शक्य आहे, मात्र याबाबत डॉक्टर आणि प्रसूतिगृहांना योग्य माहिती नसल्याने पावडरच्या दुधावर भर देतात.
सिझेरियन झालेल्या आईला आपल्या बाळाला पहिल्या दिवसापासून स्वत:हून स्तनपान करणे शक्य नसले तरी परिचारिका किंवा नातेवाइकांच्या मदतीने बाळाला एका बाजूने पकडून दूध पाजता येऊ शकते, मात्र या वेळी सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे असते. बाळाला अतिदक्षता विभागात केवळ देखरेखीसाठी ठेवल्यासही आईचे दूध पाजता येते. प्रसूतिगृहांमध्येही नातेवाइकांना याबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. साधारणपणे आईचेच दूध बाळासाठी सकस आणि परिपूणर्र् असल्याचे डॉक्टर सांगतात.