आरोग्य प्रहर

पावसाळ्यात शरीरातील वाताचा त्रास वाढतो. सांधेदुखी हे त्याचे प्रमुख लक्षण आहे. ज्यांना मुळातच सांधे दुखण्याचा त्रास आहे त्यांचा त्रास तर वाढतोच, पण निरोगी व्यक्तींनाही त्रास होण्याची शक्यता असते.
एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी वाहून नेणारा, चलन करणारा तो वात अशी वाताची साधी व्याख्या करता येईल. पृथ्वीवरील वातामुळे (म्हणजे वार्यांमुळे) विविध वातावरणीय घडना घडतात. यातील काही उपकारक तर काही विध्वंसक असतात. पाऊस देणारा मान्सून हा एक प्रकारचा कल्याणकारी वातच, पण त्या वाताने पाऊस दिलाच नाही तर तोच विध्वंसकही ठरू शकतो. आपल्या शरीराच्या आतही एक वात असतो. हा वात म्हणजे ‘वात’, ‘पित्त’ आणि ‘कफ’ प्रकृतींमधील एक. शरीरात घडणार्या प्रत्येक ज्ञात-अज्ञात क्रियांचा कर्ता हा वात आहे, असे आयुर्वेद मानतो. हा वात जेव्हा ‘प्राकृत’ असतो, आपले काम योग्य रीतीने करीत असतो तेव्हा तो चांगलाच असतो, परंतु तो विकृत किंवा प्रकोपित झाला तर शरीरासाठी त्रासदायक ठरतो.
वात प्रकोपित होण्याची कारणे अनेक आहेत. तिखट, कडू आणि कशाय (तुरट) रसाचे अतिसेवन, अतिव्यायाम, रात्रीचे अतिजागरण, तर भय, शोक, चिंता ही मानसिक कारणे आहेत. शरीरातील अधारणीय वेगांचे धारण तसेच खूप कोरडे व रुक्ष जेवण करणे यामुळे वाताचा त्रास होऊ शकतो. वर्षाऋतूत तर वातप्रकोप होण्यासाठी एकप्रकारे अनुकूलच परिस्थिती तयार झालेली असते. पावसाळ्यासाठी आयुर्वेदात ऋतुचर्या सुचवण्यात आली आहे. त्याचे पालन केल्यास वाताचे त्रास दूर ठेवण्यासाठी नक्कीच फायदा होईल. शक्यतो उकळून गार केलेलेच पाणी प्यावे.
आहारात जुने धान्य खावे. स्वयंपाकात भाज्यांना तूप-सुंठीची फोडणी द्यावी. आपला परिसर नेहमी कोरडा ठेवावा. डासांची पैदास होऊ नये यासाठी पावसाचे पाणी साठू न देणे महत्त्वाचे आहे. अंगावर घालायचे कपडेही कोरडेच असावेत. या दिवसांत अतिव्यायाम, अति चालणेही नको. शिळे अन्न खाऊ नये. कडक उपवासही नकोत. हरभर्यासारखी द्विदल धान्ये शक्यतो टाळावीत. मधाचे सेवन करावे. दम्याचा त्रास असलेल्यांना त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. अतिश्रम टाळावेत.