नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मागील अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतक ठोकून हिरो ठरलेला सलामीवीर मनजोत कालरा याला मोठा झटका बसला आहे. अंडर 16 आणि अंडर 19 स्पर्धांमध्ये खेळताना वयाशी फेरफार केल्याचा ठपका कालरावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी डीडीसीएच्या लोकपालांनी त्याला एका वर्षासाठी निलंबित केले आहे. त्याला रणजी क्रिकेट खेळता येणार नाही.
अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कालराने शतकी खेळी करून सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं, मात्र त्याला आता एका वर्षाच्या बंदीच्या शिक्षेला सामोरे जावे लागले आहे. अंडर 16 आणि अंडर 19 मध्ये खेळत असताना कथितरीत्या वय लपवल्याचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. लोकपालांनी त्याच्यावर कारवाई करत निलंबनाचे आदेश दिले. अशाच प्रकारे दिल्लीच्या संघाचा उपकर्णधार नितीश राणा यालाही काही दिवस खेळापासून दूर ठेवण्यात आले आहे. कनिष्ठ स्पर्धेत खेळताना त्याने वय लपवून फसवणूक केल्याचा आरोप आहे.
अंडर 19मध्ये खेळणार्या शिवम मावीचे प्रकरणही बीसीसीआयकडे वर्ग करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशच्या वरिष्ठ संघाचे तो नेतृत्व करतो. लोकपाल न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) बदर दुरेज अहमद यांनी आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी कालराबाबत आदेश दिला. कालराला या मोसमात रणजी खेळता येणार नाही. त्याच्यावर एका वर्षाची बंदी घातली आहे.
बीसीसीआयच्या माहितीनुसार कालराचे वय 20 वर्षे 351 दिवस आहे. गेल्या आठवड्यात तो दिल्ली अंडर 19कडून बंगालविरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्याने 80 धावा केल्या होत्या. रणजी संघात तो शिखरची जागा घेणार होता, मात्र आता तो खेळू शकणार नाही.